मागील लेखात आपण ऑपशन्स म्हणजे काय, याची माहिती घेतली. आज आपण ऑपशन्स ट्रेडिंग सुरू करण्यासाठी काय करावे याची माहिती घेऊ. ऑपशन्स मध्ये ट्रेडिंग करणे हे शेअर्समध्ये ट्रेडिंग करण्याच्या तुलनेत थोडे गुंतागुंतीचे आहे. सामान्यपणे शेअर्स आपण मंदीत खरेदी करतो आणी तेजीत विकून टाकतो. त्यातला फरक हा आपला फायदा असतो. समजा आपल्याला शेअर्सचा योग्य भाव लगेच नाही मिळाला तर आपण काही काळानंतर विकून योग्य भाव मिळवतो. थोडा जास्त अनुभवी ट्रेडर असेल तर तो तेजीत विकतो आणी मंदीत खरेदी करून नफा मिळवतो. यामध्ये एखादा इन्वेस्टर असेल, जो जास्त काळासाठी (जसे 1, 2, किंवा 5 वर्षे) गुंतवणूक करत असेल. एखादा ट्रेडर असेल जो कमी कालावधी (जसे 2 ते 6 महीने) मध्येच आपले ध्येय साधत असेल.
ऑपशन्स ट्रेडिंगमध्ये मात्र आपला मार्केटचा जसा दृष्टिकोण असेल त्याप्रमाणे प्लॅन्स (strategies) असतात. त्यासाठी त्याचा योग्य अभ्यास आणी अनुभव असणे गरजेचे आहे. ऑपशन्समध्ये ट्रेडिंग हे सामान्य पणे 1 दिवस ते 2-3 महिन्यासाठी असते.
ऑपशन्स ट्रेडिंग हे जितके फायदेशीर आहे तितकेच ते नुकसानकारक ही असू शकते. तेव्हा इथे आपले ‘भांडवल सुरक्षा’ हे सर्वात महत्त्वाचे आहे. ट्रेडिंग करताना संयमित रित्या, कमीत कमी तोटा होईल अशा प्रकारे प्लॅन घेऊन तो अमलात आणणे, याचे कौशल्य विकसित करणे महत्त्वाचे आहे. हे कौशल्य फक्त अनुभवातूनच शिकत येते. नवीन सुरुवात करताना ते पूर्ण अनुभव येई पर्यंत कमीत कमी रिस्क असेल असाच प्लॅन वापरणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या मनावर नियंत्रण, नियमबद्धता आणी ट्रेडिंगमध्ये नियमितता हे गुण ऑपशन्स ट्रेडर कडे असणे अतिशय आवश्यक आहे. हे गुण ज्यांच्याकडे असतील किंवा जे हे गुण लवकरात लवकर आत्मसात करतील तेच ऑपशन्स ट्रेडिंगमध्ये यशस्वी होतात.
कसे सुरू कराल
1. ट्रेडिंग अकाऊंट : आजकाल सर्वांचे डीमॅट अकाऊंट असतात. नसतील तर नवीन काढणे अतिशय सुटसुटीत व सोपे झाले आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणी असलेले सर्व ब्रोकर्स कडे ऑपशन्स ट्रेडिंगची सुविधा उपलब्ध असते. सर्व साधारणपणे सगळ्या ब्रोकर्सचे नियम थोडय़ा फार फरकाने सारखेच असतात. ट्रेडिंग साठी आपल्याला Collateral Security म्हणून ब्रोकरकडे डिपॉजिट द्यावे लागते. ज्याचे ब्रोकरेज कमिशन सर्वात कमी असेल असेच ब्रोकर निवडणे सोईस्कर आहे.
2. ऑपशन्स कोणते प्रकार निवडाल : नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये दोन प्रकारे ऑपशन्स ट्रेडिंगसाठी उपलब्ध आहेत. एक आहे ‘इंडेक्स ऑपशन्स’ आणि दुसरे ‘स्टॉक ऑपशन्स’. नवख्या ट्रेडर्ससाठी ‘इंडेक्स ऑपशन्स’ सर्वात उत्तम पर्याय आहेत. स्टॉक ऑप्शन हे कमीत कमी दोन वर्षे अनुभव असेल त्यानीच करावे, कारण स्टॉक ऑप्शनमध्ये अस्थिरता खूप जास्त असते.
3. कोणत्या स्टॅटेजी निवडाल : ऑपशन्समध्ये ट्रेडिंग करण्याची एक विशिष्ट पद्धत असते, सिस्टम असते. ट्रेडरची जोखीम घेण्याची क्षमता, त्याच्याकडे असलेले भांडवल, त्याची ट्रेडिंग करण्याची मानसिकता, नफा मिळवण्याचे ध्येय, हे सर्व घटक, प्लॅन निवडण्यासाठी महत्त्वाचे आहेत. आपली ट्रेडिंगची पद्धत कोणती ती शोधणे आणि अमलात आणणे यावर आपले यश अवलंबून आहे.
4. मार्केटची दिशा व ट्रेडिंग
ऑपशन्स ट्रेडिंगमध्ये वरती जाणे (Bullish), खाली जाणार (Bearish) किंवा तटस्थ राहणार यावर आपण कोणता प्लॅन घ्यावा हे ठरवता येते. म्हणूनच ऑपशन्स ट्रेडिंग मार्केटच्या कोणत्याही स्थितीत साध्य करता येते.
निष्कर्ष
जर हे योग्य प्रकारे शिकलो व वापरात आणले तर ऑपशन्स ट्रेडिंग हे आपले आर्थिक ध्येय साध्य करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
– सत्यजीत कुलकर्णी