मागील आठवडय़ात कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण, युक्रेन युद्धाबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय, फेड रिझर्व्हने व्याजदर वाढवतानाच केलेले सकारात्मक निवेदन, सरकारी बँकांनी दर्शवलेला नफा, चीनी सरकारने आर्थिक पाठबळाबाबत दर्शवलेली आश्वासकता, भारताचा रशियाकडून तेलखरेदीचा संकल्प आणि एफआयआयचा थांबलेला विक्रीचा ओघ अशा एकामागून एक आलेल्या सकारात्मक घटनांमुळे बाजारात तेजीचे तुफान परतले. बहुतांश निर्देशांक शुक्रवारी हिरवे निशाण दाखवत बंद झाले. यावरुन बाजाराचा कल पालटल्याचे दिसत आहे. तथापि, चीन-तैवान संघर्ष आणि कोरोनाचे पुनरागमन, महागाई यांची विघ्ने अद्यापही कायम आहेत.
गेल्या सव्वा महिन्यापासून जगभरातील शेअर बाजारांबरोबरच भारतीय बाजारातही मोठी उलथापालथ झाली. सर्व निर्देशांक आणि लार्जकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप अशा सर्व श्रेणीतील बहुतांश समभागांमध्ये जबरदस्त घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले होते. युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धामुळे जागतिक अर्थकारणाची एकूण घडी विस्कटून गेली. हे युद्ध महायुद्धाचे स्वरुप धारण करेल की काय अशा शक्यता निर्माण झाल्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी नफावसुलीसाठी विक्रीचा सपाटा लावला. पाहता पाहता शांघाय, डाऊ, निक्की, हँगसेंग, निफ्टी, सेन्सेक्स अशा सर्व निर्देशांकांनी गटांगळ्या खाण्यास सुरुवात केली. भारतीय शेअर बाजारात सुमारे 16 टक्क्यांची घसरण झाली; तर डाऊ 9 टक्क्यांनी घसरला. ही घसरण कुठवर खाली जाणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. परंतु टप्प्याटप्प्याने जगभरातील बाजार सावरण्यास सुरुवात झाली. मागील 8 सत्रांचा विचार करता निफ्टीने 15671 पासून चढती भाजणी दर्शवत 1673 अंकांची भरारी घेतली आहे. गेल्या आठवडय़ाच्या अखेरीस गुरुवारी 311.70 अंकांची वाढ दर्शवत निफ्टी 17,287.05 अंकांवर बंद झाला; तर सेन्सेक्समध्ये 1047.28 अंकांची वाढ होत तो 57,863.93 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टीमध्ये 680.30 अंकांची वाढ होऊन 36,428.55 च्या पातळीवर तो बंद झाला. विशेषबाब म्हणजे फेडरल रिझर्व्हकडून पाव टक्क्यांची व्याजदरवाढ झाल्यानंतरचा हा तेजीचा कल असल्याने तो अधिक महत्त्वाची आहे.
या तेजीस काही प्रमुख कारणे होती. सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण. दुसरे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाला युद्ध थांबवण्याबाबत दिलेला निकाल. तिसरे कारण म्हणजे भारतातील सरकारी बँकांनी दर्शवलेला नफा. चौथे कारण म्हणजे फेड रिझर्व्हकडून भलेही व्याजदरात वाढ करण्यात आली असली तरी पॉवेल यांनी केलेल्या निवेदनातून अमेरिकन अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक अंदाज वर्तवण्यात आले आहे. तसेच फेडच्या निर्णयाबाबतचा जो संभ्रम होता तो संपुष्टात आल्याचे गुंतवणूकदारांनी त्याचे स्वागत केले. दुसरीकडे चीनी सरकारने बाजाराला पाठबळ देणारी धोरणे आखण्याबाबतचा आशावाद व्यक्त केला आहे. याखेरीज भारतीय बाजारात झालेल्या घसरणीचे मुख्य कारण होते ते विदेशी गुंतवणूकदारांकडून लावलेला विक्रीचा सपाटा. मागील आठवडय़ात तर गुरुवारी एफआयआयकडून 2800 कोटींची खरेदी दिसून आली आहे. साहजिकच यामुळे बाजाराला बूस्टर मिळाला. याखेरीज सरकारी बँकांच्या नफ्याची आकडेवारी जाहीर झाल्याने बँकिंग क्षेत्रातील समभागात तेजीची लाट आली. चालू आर्थिक वर्षांत एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत एकही सरकारी बँक तोटय़ात नसल्याचे दिसून आले आहे. सर्वच सरकारी बँकांनी मिळून या कालावधीत 48 हजार 874 कोटींचा दणदणीत नफा कमावला आहे. या सर्व सकारात्मक बातम्यांचा संगम जुळून आल्यामुळे बाजारात जोरदार तेजी दिसून आली. टेक्निकल चार्टनुसार निफ्टी लवकरच 17500 ते 17800 चा टप्पा गाठेल असे दिसते. बँक निफ्टीही 36,250 च्या वरची पातळी टिकवण्यात यशस्वी झाल्यास लवकरच 37 हजारांचा टप्पा गाठू शकतो.
एका बाजूला ही सर्व सकारात्मक स्थिती असली तरी काही अडथळेही दिसत आहेत. चीन आणि तैवान यांच्यातील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. याखेरीज चीन, दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. यामुळे भारतानेही प्रतिबंधात्मक उपायांची चाचपणी सुरू केली आहे. कमोडीटींचा विचार करता कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा 100 डॉलर्सच्या दिशेने जात आहेत. शुक्रवारी त्या 107 डॉलर्सवर गेल्या होत्या. बँक ऑफ इंग्लंडने तिसऱयांदा व्याजदरात वाढ केली आहे. या सर्वांचा बाजारावर कसा परिणाम होतो हे पहावे लागेल.
गुंतवणूकदारांच्या दृष्टीने विचार करता कोरोमंडल इंटरनॅशनल, रिलायन्स इंडस्ट्रीज, पिरॅमल एंटरप्रायजेस, एचडीएफसी, युनायटेड स्पिरिटस्, अदानी एंटरप्रायजेस, टाटा कझ्युमर उत्पादन, कोटक महिंद्रा बँक, आयसीआसयीआय बँक, टाटा स्टील, एसबीआय, वेदांता, सेल, भारती एअरटेल, ज्युबिलंट फूड, बँक ऑफ बडोदा, ऍक्सिस बँक यांमध्ये गुंतवणुकीच्या संधी आहेत.
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मागील काळात संधी निसटली असल्यास आताचा काळ योग्य आहे. यादृष्टीने टाटा मोटर्सचा समभाग 530 रुपयांचे लक्ष्य ठेवून, अशोक लेलँड 140 रुपये लक्ष्य, गेल 190 रुपये लक्ष्य, ओएनजीसी 230 रुपये लक्ष्य, पर्सिस्टंट सिस्टीम 4600 रुपये लक्ष्य, श्याम मेटॅलिक्स 400 रुपये लक्ष्य, गुजरात अंबुजा सिमेंट 270 रुपये लक्ष्य, ओबेरॉय प्रॉपर्टी 990 रुपये लक्ष्य, आयओसी 140 रुपये लक्ष्य ठेवून खरेदी करता येतील. याखेरीज एसबीआय, आयटीसी, टीसीएस, इन्फोसिस, एल अँड टी यांसारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचीही ही संधी दवडता कामा नये. टाटा पॉवरच्या समभागातही येत्या काळात दमदार तेजी पहावयास मिळू शकते. याखेरीज सदर्न पेट्रोकेमिकल्सचा समभागही 75 रुपयांचे लक्ष्य ठेवून खरेदी करता येईल.एकंदरीत, आयटी, बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, ऊर्जा, रिअल इस्टेट या क्षेत्रातील समभागांत येत्या काळात तेजी अपेक्षित आहे.
जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा की, निफ्टी जोपर्यंत 17000 च्या वरच्या पातळीवर आहे तोपर्यंत फार मोठय़ा भीतीचे कारण नाही. मात्र याखालील पातळीवर क्लोजिंग झाल्यास सावध होणे आवश्यक आहे. तसेच जागतिक पातळीवरील घडामोडींचे त्वरित परिणाम विचारात घेता त्यांकडे बारकाईने लक्ष ठेवून राहणे आवश्यक आहे.
– संदीप पाटील