प्रतिनिधी / कोल्हापूर
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत तब्बल 18 वर्षांनी साखळी फेरीसाठी पात्र ठरत शिवाजी विद्यापीठ संघाने कांस्य पदक पटकावले. सोनीपत (हरियाणा) येथे झालेल्या या स्पर्धेचे दिनबंधू छोटूराम अभियांत्रिकी व तंत्र विद्यापीठाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
बाद पद्धतीने खेळवलेल्या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात शिवाजी विद्यापीठ संघाने रोहतक येथील एम. डी. विद्यापीठ संघाला 2-1 फरकाने तर दुसऱया सामन्यात पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाला 1-0 धावेने हरवले. नांदेड संघावरही एकतर्फी वर्चस्व गाजवत शिवाजी विद्यापीठ संघाने 2-7 धावफरकाने विजय मिळवत उपांत्यपूर्व सामन्यात प्रवेश केला. या सामन्यातही शिवाजी विद्यापीठ संघाने स्पर्धेचा गतविजेता गुरुनानक देव विद्यापीठावर 4-1 धावफरकाने विजय मिळवला. या विजयामुळेच शिवाजी विद्यापीठाचा संघ 18 वर्षांनी साखळी फेरीसाठी पात्र ठरला.
या फेरीत शिवाजी विद्यापीठ संघाने तीन सामने खेळले. यापैकी पहिल्या सामन्यात शिवाजी विद्यापीठ संघाने दिल्ली विद्यापीठाचा 8-3 धावफरकाने पराभव करत आपले आव्हान निर्माण केले. कालिकत विद्यापीठाविरुद्ध शिवाजी विद्यापीठाचा झालेला दुसरा साखळी सामना अटीतटीचा झाला. मात्र या सामन्यात कालिकत विद्यापीठाकडून शिवाजी विद्यापीठ संघाला 7-5 धावफरकाने पराभव स्वीकारावा लागला. तिसऱया सामन्यातही यजमान चंदीगड विद्यापीठाने शिवाजी विद्यापीठ संघाचा एका धावाने पराभव केला. साखळी दोन सामन्यात शिवाजी विद्यापीठ संघाला भलेही पराभव स्वीकारावा लागला असला तरी दिल्ली विद्यापीठ संघावर मिळवलेला विजय कामी आल्याने शिवाजी विद्यापीठ संघाच्या गळ्यात कांस्य पडले.
कांस्य पदक विजेता शिवाजी विद्यापीठ संघातील अन्य खेळाडूंची नावे अशी
वाणी ताटी, साक्षी भेंडिगिरी, निशा आयवळे, स्नेहल पाटोळे, मैथिली पाटील, सुजाता थोरवडे, राणी सोळवंडे, वैष्णवी मोहिते, पल्लवी कांबळे. प्रशिक्षक ज्योती डवाळे व संघ व्यवस्थापक प्रा. डॉ. बाबासाहेब उलपे.