ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. येथे होणाऱ्या 14 व्या भारत-जपान शिखर परिषदेत ते सहभाग घेतील. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता ते दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये युक्रेनवरील संकट, चीनचे धोके तसेच आगामी काळात दोन्ही देशांमध्ये आर्थिक सहकार्य वाढवण्याबाबत आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय जपानच्या समुद्रात रशियन हवाई दलाबरोबर संयुक्त हवाई सराव आणि सुलू समुद्रात फिलिपाईन्सच्या अखत्यारीतील समुद्रात युद्धनौका पाठवण्याबाबतही चर्चा होणार आहे. उद्या (20 मार्च) रोजी किशिदा कंबोडियाला रवाना होणार आहेत.
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात 2019 मध्ये झालेली बैठक आसाममध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. किशिदा यांची भेट याच वेळापत्रकाचा भाग आहे.
दरम्यान, भारत आणि जपानमध्ये मोठय़ा प्रमाणावर आयात-निर्यात होत असते. भारत प्रामुख्याने जपानला कापड, लोखंड आणि पोलाद उत्पादने, पेट्रोलियम उत्पादने, कापड धागा, कापड आणि यंत्रसामग्री निर्यात करतो. तर भारत जपानकडून प्लास्टिक, विद्युत यंत्रसामग्री, लोखंड व पोलाद उत्पादने, वाहनांचे सुटे भाग, सेंद्रिय रसायने व धातू यांची आयात करतो. 2000 ते 2019 या काळात भारतात जपानी गुंतवणूक 32 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.









