‘नव्या रुपात, नव्या ढंगात’, मनोरंजनासह कलागुणांचे व्यासपीठ उपलब्ध
प्रतिनिधी /बेळगाव
महिलांमध्ये असणाऱया ऊर्जेला, कलागुणांना वाव मिळावा, या हेतूने ‘तरुण भारत’ने नव्याने उर्जिता हे व्यासपीठ सुरू केले आहे. वृत्तपत्र सेवेचे शतक पूर्ण करून बेळगावकरांच्या मनात विश्वासाचे आणि जिव्हाळय़ाचे स्थान तरुण भारतने मिळविले आहे. तरुण भारतने नेहमीच समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडतानाच बेळगावमधील सांस्कृतिक दालन समृद्ध करण्यास हातभार लावला आहे.
महिलांच्या प्रश्नांची दखल तरुण भारतने नेहमीच घेतली आहे. आज महिला सर्वार्थाने सक्षम झाल्या असून आपल्या प्रश्नांची सोडवणूकही त्या करू शकतात. त्यांच्याकडे असणाऱया विविध कलागुणांच्या कौशल्यांना वाव मिळावा, त्याची नोंद घेतली जावी आणि त्यांचे कर्तृत्व समाजापर्यंत पोहोचावे, यासाठी उर्जिता हे व्यासपीठ सुरू करण्यात येत आहे.
दोन वर्षांपूर्वी तरुण भारतने महिलांसाठी व्यासपीठ सुरू केले. मात्र, कोरोनाच्या अचानक उद्भवलेल्या संकटाने सर्वच उपक्रम स्थगित करावे लागले. आता हे संकट टळले आहे. त्यामुळे कोरोनानंतर ‘नव्या रुपात, नव्या ढंगात’, मनोरंजनासह कलागुणांचे व्यासपीठ ‘तरुण भारत’ उपलब्ध करून देत आहे. त्याचवेळी बौद्धिक आणि वैचारिक चर्चेचेसुद्धा हे व्यासपीठ असेल.
विविध कार्यक्रम होणार
काळानुरूप आपण बदलणे आवश्यक आहे. बदलत्या काळानुरूप स्त्राr समाजाच्या प्रगतीसाठीसुद्धा अनेक बदल आवश्यक आहेत. स्त्रियांनी संघटित व्हावे आणि मनोरंजनाबरोबरच बौद्धिक, वैचारिक विकास साधावा, परस्परांच्या कल्पनांचे आदान-प्रदान करावे, या हेतूने उर्जिता आपल्या भेटीस येत आहे. उर्जिताची सदस्य नोंदणी आवश्यक असून नेंदणीकृत सदस्यांसाठी वर्षभर विविध स्पर्धा, चर्चासत्रे, महिलांसाठी उपयुक्त व्याख्याने, स्नेहमेळावे, शिबिरे, प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे.
नोंदणीसाठी आवाहन
‘उर्जिता’ची सशुल्क नोंदणी आवश्यक आहे. यासाठी तरुण भारत कार्यालयामध्ये दुपारी 12 ते 2 यावेळेत महिलांना सशुल्क नोंदणी करता येईल. फार्म भरून नोंदणीकृत झालेल्या महिलांना ओळखपत्र दिले जाईल आणि लवकरच उर्जिताचे उपक्रम सुरू होतील. बेळगावकर महिलांनी याची नोंद घ्यावी व उर्जिताचे सदस्यत्व लवकरात लवकर स्वीकारावे, असे आवाहन तरुण भारतने केले आहे.









