सैन्य महासत्ता अडचणीत : अनेक देश-वित्तीय संस्थांचा पैसा बुडण्याची शक्यता
युक्रेनसोबत युद्ध छेडल्यावर सैन्य महासत्ता असलेल्या रशियाची आर्थिक स्थिती निर्बंधांमुळे बिघडू लागली आहे. रशिया कर्जाचा थकबाकीदार ठरण्याची शक्यता वाढू लागली आहे. रशिया थकबाकीदार ठरण्याची स्थिती निर्माण झाल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. रशिया थकबाकीदार देश ठरल्यास त्याच्याशी जोडले गेलेल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवरही संकट निर्माण होणार आहे.
विविध देश आणि जागतिक वित्तीय संस्थांकडून घेण्यात आलेले कर्ज आणि त्यावरील व्याज निर्धारित मुदतीत रशिया फेडू न शकल्यास तो थकबाकीदार ठरणार आहे. यामुळे अनेक देश आणि संस्थांचा निधी अडकून पडू शकतो किंवा बुडू शकतो.
रशियाकडे कर्ज फेडण्यासाठी पुरेसा निधी आहे, परंतु अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे त्याला स्वतःच्या रकमेचा वापर करता येत नसल्याची स्थिती आहे.
निर्बंधांमुळे रशियासाठी आयएमएफकडून स्पेशल ड्रॉइंग राइट्स किंवा एसडीआरचा वापर करणे देखील अवघड ठरले आहे. तर पतमानांकन संस्थांनी रशियाचे कर्ज मानांकन कमी केले आहे. रशिया आता थकबाकीदार ठरणे निश्चित आहे. रशिया यावर्षी थकबाकीदार ठरण्याची शक्यता 71 टक्के असल्याचे फिच रेटिंग्सने म्हटले आहे.
रशियासमोर क्रेडिट डिफॉल्ट स्वॅपचा मार्ग आहे. कर्ज न फेडू शकलेल्या देशनी या मार्गाच वापर 2008 च्या वित्तीय संकटादरम्यान मोठय़ा प्रमाणावर केला होता. परंतु सद्यस्थितीत रशिया या मार्गाद्वारे स्वतःचे कर्ज फेडू शकेल का यावर संशय व्यक्त होतोय. रशियाला रुबल या स्वतःच्या चलनात कर्ज फेडण्याची संधी मिळाली तरच हे शक्य आहे. परंतु डॉलरच्या तुलनेत रुबलचे मूल्य अत्यंत खालावल्याने कर्जप्रदाते देश आणि वित्तीय संस्था रुबलमध्ये रक्कम स्वीकारण्याची शक्यता धूसर आहे.
सोन्याचा मोठा भांडार
रशियाकडे सोन्याचा मोठा भांडार आहे. तसेच 630 अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन देखील आहे. परंतु निर्बंधांमुळे यातील बहुतांश रक्कम अन्य देशांमध्ये अडकून पडली आहे. अमेरिकेने रशियाचे 132 अब्ज डॉलर्सचे सोने जप्त केले आहे. तसेच स्वतःच्या बँकांमध्ये जमा रशियाच्या विदेशी चलनाचा मोठा हिस्सा गोठविला आहे.









