मालिकेवर 2-0 फरकाने एकतर्फी शिक्कामोर्तब, श्रेयस अय्यर सामनावीर, रिषभ पंत मालिकावीर
बेंगळूर / वृत्तसंस्था
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेचा 238 धावांनी फडशा पाडत 2 कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशा एकतर्फी फरकाने खिशात घातली. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील या डे-नाईट लढतीत विजयासाठी 447 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार दिमुथ करुणारत्नेने तडफदार शतक जरुर झळकावले. पण, यानंतरही लंकेचा दुसरा डाव 59.3 षटकात सर्वबाद 208 धावांमध्येच आटोपला. श्रेयस अय्यर सामनावीर तर रिषभ पंत मालिकावीर पुरस्काराचे मानकरी ठरले.
चहापानानंतर 4 बाद 151 या धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात करताना लंकन कर्णधार करुणारत्ने व निरोशन डिकवेला यांनी पाचव्या गडय़ासाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. पण, डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने डिकवेलाला यष्टीरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. चरिथ असालंका (5) अक्षरचा दुसरा बळी ठरला. तो बाद झाल्यानंतर लंकेची 6 बाद 180 अशी आणखी पडझड झाली.
एक बाजू लावून धरणाऱया करुणारत्नेने आणखी संघर्षमय खेळ साकारत चौकार फटकावत थाटात शतक साजरे केले आणि त्याचबरोबर एम्बुल्डेनियाच्या साथीने संघाला 200 धावांचा टप्पा सर करुन दिला. पण, जसप्रित माऱयाला आल्यानंतर त्याने शतकवीर करुणारत्नेचा त्रिफळा उडवला आणि त्यानंतर लंकेचा पराभव ही निव्वळ औपचारिकता होती.
करुणारत्ने बाद झाल्यानंतर लंकेची 7 बाद 204 अशी स्थिती होती. त्यानंतर पुढील षटकातच एम्बुल्डेनियाला 2 धावांवर पायचीत होत परतावे लागले. बुमराहने सुरंगा लकमलला एका धावेवर बाद करत सामन्यातील आठवा बळी नोंदवला. अश्विनने विश्वा फर्नांडोला बाद केले आणि येथेच लंकेचा डाव 208 धावांवर आटोपला. अश्विनने दुसऱया डावात 4 बळी घेतले. भारतासाठी हा मायदेशातील तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना असून सदर तिन्ही सामने भारताने एकतर्फी फरकाने जिंकले आहेत.
सोमवारी, दिवसाच्या प्रारंभी लंकेने 1 बाद 28 या मागील धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर करुणारत्ने व कुशल मेंडिस यांनी सावध पवित्र्यावर भर देणे अधिक पसंत केले. मेंडिसने नंतर 57 चेंडूत अर्धशतक साजरे केले. अखेर अश्विनने मेंडिसला पंतकरवी यष्टीचीत करत ही जोडी फोडली. त्यानंतर जडेजाने मॅथ्यूजला 1 धावेवर बाद करत लंकेची 3 बाद 98 अशी स्थिती केली. धनंजया शॉर्ट लेगवर झेल देऊन बाद झाल्यानंतर लंकेच्या अडचणीत आणखी भर पडली होती.
धावफलक
भारत पहिला डाव ः सर्वबाद 252.
श्रीलंका पहिला डाव ः सर्वबाद 109.
भारत दुसरा डाव ः 9 बाद 303 वर घोषित.
श्रीलंका दुसरा डाव ः लाहिरु थिरिमने पायचीत गो. बुमराह 0 (3 चेंडू), दिमुथ करुणारत्ने त्रि. गो. बुमराह 107 (174 चेंडूत 15 चौकार), कुशल मेंडिस यष्टीचीत पंत, गो. अश्विन 54 (60 चेंडूत 8 चौकार), अँजिलो मॅथ्यूज त्रि. गो. जडेजा 1 (5 चेंडू), धनंजया डीसिल्व्हा झे. विहारी, गो. अश्विन 4 (21 चेंडू), निरोशन डिकवेला यष्टीचीत पंत, गो. पटेल 12 (39 चेंडू), चरिथ असालंका झे. शर्मा, गो. पटेल 5 (20 चेंडूत 1 चौकार), लसिथ एम्बुल्डेनिया पायचीत गो. अश्विन 2 (22 चेंडू), सुरंगा लकमल त्रि. गो. बुमराह 1 (4 चेंडू), विश्वा फर्नांडो झे. शमी, गो. अश्विन 2 (6 चेंडू), प्रवीण जयविक्रमा नाबाद 0 (4 चेंडू). अवांतर 20. एकूण 59.3 षटकात सर्वबाद 208.
गडी बाद होण्याचा क्रम
1-0 (थिरिमने, 0.3), 2-97 (मेंडिस, 19.4), 3-98 (मॅथ्यूज, 20.4), 4-105 (धनंजया, 27.5), 5-160 (डिकवेला, 41.6), 6-180 (असालंका, 49.5), 7-204 (करुणारत्ने, 56.5), 8-206 (एम्बुल्डेनिया, 57.3), 9-208 (लकमल, 58.2), 10-208 (फर्नांडो, 59.3).
गोलंदाजी
जसप्रित बुमराह 9-4-23-3, शमी 6-0-26-0, अश्विन 19.3-3-55-4, रविंद्र जडेजा 14-2-48-1, अक्षर पटेल 11-1-37-2.
सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱया गोलंदाजात अश्विन आठवा!
भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने सोमवारी 439 कसोटी बळींचा दक्षिण आफ्रिकन जलद गोलंदाज डेल स्टीनचा विक्रम चिन्नास्वामी स्टेडियमवर मागे टाकला. अश्विनने तिसऱया दिवशी धनंजया डीसिल्व्हाला बाद करत आपला 440 वा कसोटी बळी नोंदवला. शिवाय, सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱया गोलंदाजांमध्ये आठवे स्थान प्राप्त केले.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱया गोलंदाजांमध्ये मुरलीधरन (800), शेन वॉर्न (708) व जेम्स अँडरसन (640) पहिल्या तीनमध्ये आहेत. याशिवाय, सध्या खेळत असलेल्या गोलंदाजांमध्ये अश्विन हा अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड (537) यांच्यानंतर तिसऱया स्थानी विराजमान आहे.
गोलंदाज / संघ / कालावधी / सामने / बळी / डावात सर्वोत्तम
मुथय्या मुरलीधरन / श्रीलंका / 1992-2010 / 133 / 800 / 9-51
शेन वॉर्न / ऑस्ट्रेलिया / 1992-2007 /145 / 708 / 8-71
जेम्स अँडरसन / इंग्लंड / 2003-2022 / 169 / 640 / 7-42
अनिल कुंबळे / भारत / 1990-2008 / 132 / 619 / 10-74
ग्लेन मॅकग्रा / ऑस्ट्रेलिया / 1993-2007 / 124 / 563 / 8-24
स्टुअर्ट ब्रॉड / इंग्लंड / 2007-2022 / 152 / 537 / 8-15
कर्टनी वॉल्श / विंडीज / 1984-2001 / 132 / 519 / 7-37
रविचंद्रन अश्विन / भारत / 2011-2022 / 86 / 442 / 7-59
डेल स्टीन / द. आफ्रिका / 2004-2019 / 93 / 439 / 7-51
कपिलदेव / भारत / 1978-1994 / 131 / 434 / 9-83
श्रेयसला जबाबदारीची पूर्ण कल्पना होती ः रोहित शर्मा
या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात संघातर्फे सर्वाधिक धावा जमवणाऱया श्रेयस अय्यरच्या योगदानाची रोहित शर्माने यावेळी मुक्तकंठाने प्रशंसा केली. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांच्यासारख्या दिग्गज फलंदाजांची जागा भरुन काढण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, याची त्याला पूर्ण कल्पना होती आणि त्याने अतिशय चोख योगदान दिले, असे रोहित म्हणाला. पहिल्या डावात 92 व दुसऱया डावात 67 धावा जमवणाऱया श्रेयसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
‘लंकेविरुद्ध टी-20 मालिकेतील फॉर्म श्रेयसने येथेही कायम राखला. रहाणे, पुजारासारख्या अनुभवी फलंदाजांची जागा भरुन काढण्यासाठी आवश्यक सर्व क्षमता, गुण त्याच्याकडे आहेत. यापुढेही त्याची कामगिरी आणखी सरस होईल’, असे कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.
रोहितने याप्रसंगी अष्टपैलू रविंद्र जडेजाचेही कौतुक केले. ‘जडेजा यापूर्वी मोहाली कसोटी सामन्यात फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर स्टार परफॉर्मर ठरला. त्याच्यामुळे संघ मजबूत झाला असून उत्तम क्षेत्ररक्षणाच्या कौशल्यामुळे तो आमच्यासाठी कम्प्लिट पॅकेज असतो’, याचा रोहितने येथे उल्लेख केला.









