टोरंटो / वृत्तसंस्था
कॅनडातील एका रस्ते अपघातात पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कॅनडातील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी ही माहिती दिली. टोरंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाची टीम मदतीसाठी पीडितांच्या मित्रांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी पाच विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.
व्हॅन आणि टेलरची धडक झाल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार स्पष्ट झाले आहे. या अपघातात हरप्रीत सिंग, जसपिंदर सिंग, करणपाल सिंग, मोहित चव्हाण आणि पवन कुमार यांचा मृत्यू झाला. मृतांचे वय 21 ते 24 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व मृत विद्यार्थी ग्रेटर टोरंटो आणि माँट्रियल भागात वास्त्यव्यास होते. सात विद्यार्थ्यांचा एक गट शहराबाहेर फिरण्यासाठी गेले असता ओंटारियो भागात त्यांच्या व्हॅनला अपघात झाला. दुर्घटनेप्रकरणी ओंटारिया पोलीस अधिक तपास करत आहेत. या अपघातानंतर मदत व बचावकार्यादरम्यान मुख्य महामार्ग जवळपास दोन तास बंद होता.
भारतातून दरवर्षी 10 लाख लोक शिक्षणाच्या निमित्ताने विदेशात जात असतात. 2021 च्या प्रारंभीच्या चार महिन्यांमध्ये 67 हजार भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कॅनडात जाण्याची अनुमती देण्यात आली होती. 2020 च्या तुलनेत हा आकडा जवळपास 83 टक्के अधिक आहे.








