गल्लोगल्ली रांगोळय़ा रेखाटून फुलांच्या वर्षावाने स्वागत : बँडच्या लयबद्ध तालावर संचलन

प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने फाल्गुन मास दशमीच्या मुहूर्तावर रविवारी शहरातून भव्य असे पथसंचलन करण्यात आले. या संचलनामध्ये नागरिक पारंपरिक पद्धतीने शिस्तबद्ध व लयबद्धरीत्या सहभागी झाले होते. हातामध्ये काठय़ा, भगवा ध्वज, स्वागतासाठी गल्लोगल्ली घालण्यात आलेल्या रांगोळय़ा व फुलांचा झालेला वर्षाव यामुळे शहरात एक वेगळेच वातावरण पाहायला मिळाले.
राष्ट्रीय स्वसंसेवक संघाच्यावतीने दरवषी बेळगावमध्ये पथसंचलन केले जाते. कोरोनामुळे मध्यंतरी खंड पडला होता. त्यामुळे यावषी भव्य असे पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. हिंदू धर्माच्या एकात्मतेचे दर्शन यामधून दिसून आले. टोपी, पांढरा शर्ट व राखाडी पॅन्ट घालून संघाचे सदस्य सहभागी झाले होते. बँडच्या लयबद्ध तालावर संचलन करण्यात आले.
लिंगराज कॉलेज मैदानापासून या संचलनाला सुरुवात झाली. गोंधळी गल्ली, कंग्राळ गल्ली, काकतीवेस रोड, शनिवार खूट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसुरकर गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली येथून लिंगराज कॉलेज येथे संचलनाची सांगता झाली.
संचलनासाठी मार्गामध्ये बदल
विकेंड असल्यामुळे नोकरदारांची खरेदीसाठी शहरात गर्दी होते. हे लक्षात घेऊन रविवारी दुपारी 4 वाजल्यापासून शहरात येणाऱया मार्गांमध्ये बदल करण्यात आला. काँग्रेस रोडवरून येणारी वाहतूक ग्लोब थिएटर येथून वळविण्यात आली. शहरातही पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पथसंचलन ज्या भागात येईल त्या भागातील वाहतूक थांबविण्यात येत होती. यामुळे काही काळ वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.
ठिकठिकाणी फुलांच्या वर्षावाने स्वागत
पथसंचलनाच्या मार्गावर आकर्षक रांगोळय़ा घातल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस यांच्या मूर्ती व प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. गल्लीमध्ये दाखल होताच फुलांचा वर्षाव केला जात होता. काही ठिकाणी चिमुकल्यांनी केलेले पेहराव लक्षवेधी ठरत होते.









