वृत्तसंस्था/ सेंट जोन्स
यजमान विंडीज आणि इंग्लंड यांच्यातील पहिली क्रिकेट कसोटी शनिवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी अनिर्णित राहिली. या सामन्यात इंग्लंडने विंडीजला निर्णायक विजयासाठी 70 षटकांत 286 धावांचे आव्हान दिल्यानंतर विंडीजने दुसऱया डावात 4 बाद 147 धावा जमविल्या. इंग्लंडच्या दुसऱया डावात कर्णधार रूटने आपले कसोटीतील 24 वे शतक झळकविले.
या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 311 धावा जमविल्यानंतर विंडीजने पहिल्या डावात 375 धावा जमवित इंग्लंडवर 64 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली. विंडीजच्या पहिल्या डावात बॉनेरने शानदार शतक (123) झळकविले. त्यानंतर इंग्लंडने 1 बाद 217 या धावसंख्येवरून शेवटच्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि त्यांनी आपला दुसरा डाव 88.2 षटकांत 6 बाद 349 धावांवर घोषित करून विंडीजला निर्णायक विजयासाठी 70 षटकांत 286 धावांचे आव्हान दिले. क्रॉले आणि रूट यांनी दुसऱया गडय़ासाठी 201 धावांची भागिदारी केली. होल्डरने क्रॉलेचा त्रिफळा उडविला. त्याने 216 चेंडूत 16 चौकारांसह 121 धावा जमविल्या. रूट आणि लॉरेन्स यांनी तिसऱया गडय़ासाठी 70 धावांची भर घातली. जोसेफने लॉरेन्सला झेलबाद केले. त्याने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 37 धावा जमविल्या. विंडीजच्या जोसेफने कर्णधार रूटल त्रिफळाचीत केले. त्याने 204 चेंडूत 6 चौकारांसह 109 धावा झळकविल्या. कसोटीतील रूटचे हे 24 वे शतक आहे. रॉचने स्टोक्सला 13 धावावर तर जोसेफने फोक्सला एका धावेवर बाद केले. बेअरस्टो 1 चौकारांसह 15 तर वोक्स एक चौकारांसह 18 धावांवर नाबाद राहिले. उपाहारापूर्वीच इंग्लंडने आपल्या दुसऱया डावाची घोषणा केली. इंग्लंडने दुसऱया डावात 88.2 षटकांत 6 बाद 349 धावा जमविल्या. विंडीजतर्फे जोसेफने 3 तर रॉचने दोन आणि होल्डरने 1 गडी बाद केला.
उपाहारापूर्वीच्या खेळातील शेवटची चार षटके बाकी होती. विंडीजने आपल्या दुसऱया डावाला सुरूवात केली आणि उपाहारापर्यंत त्यांनी सावध फलंदाजी केली. उपाहारानंतर विंडीजच्या डावातील 26 व्या षटकांत स्टोक्सने कर्णधार बेथवेटला पायचीत केले. ब्रेथवेटने 82 चेंडूत 3 चौकारांसह 33 धावा जमविताना कँपबेलसमवेत पहिल्या गडय़ासाठी 59 धावांची भागिदारी केली. कँपबेलला इंग्लंडच्या क्रॉलेकडून जीवदान मिळाले होते. इंग्लंडच्या लीचने कँपबेलला झेलबाद केले. त्याने 73 चेंडूत 1 चौकारांसह 22 धावा जमविल्या. लीचने विंडीजला आणखी एक धक्का देताना ब्रुक्सला 5 धावांवर झेलबाद केले. लीचने ब्लॅकवूडला दोन धावांवर पायचीत करून विंडीजवर चांगलेच दडपण आणले. विंडीजची स्थिती त्यावेळी 4 बाद 67 अशी केविलवाणी होती. त्यानंतर बॉनेर आणि होल्डर यांनी चिवट फलंदाजी करत ही कसोटी अनिर्णित राखली. या जोडीने आठव्या गडय़ासाठी अभेद्य 87 धावांची भागिदारी केली. बॉनेरने 8 चौकारांसह नाबाद 38 तर होल्डरने 3 चौकारांसह नाबाद 37 धावा जमविल्या. विंडीजने 70.1 षटकांत 4 बाद 147 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे लीचने 57 धावांत 3 तर स्टोक्सने 1 गडी बाद केला. उभय संघांमध्ये तीन सामन्यांची ही कसोटी मालिका खेळविली जात असून दुसरी कसोटी बिजटाऊन येथे येत्या बुधवारपासून सुरू होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प. डाव सर्वबाद 311, विंडीज प. डाव सर्वबाद 375, इंग्लंड दु. डाव 6 बाद 349 डाव घोषित (क्रॉले 121, रूट 109, लॉरेन्स 37, जोसेफ 3 बळी, रॉच 2 बळी, होल्डर 1 बळी), विंडीज दु. डाव 70.1 षटकांत 4 बाद 147 (बॉनेर नाबाद 38, होल्डर नाबाद 37, ब्रेथवेट 33, कँपबेल 22, लीच 3-57, स्टोक्स 1-24).









