चर्चेनंतर फ्रान्सच्या अध्यक्षांनी केला खुलासा
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे युक्रेनसोबतचे युद्ध संपविण्याच्या मूडमध्ये सध्या दिसून येत नसल्याचे फ्रान्सच्या अध्यक्षीय भवनाच्या एका अधिकाऱयाने म्हटले आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मन चॅन्सेलर ओलाफ स्कोल्ज यांच्यासोबत एका कॉलदरम्यान पुतीन यांनी युक्रेनसोबतचे युद्ध समाप्त करण्याची इच्छा दर्शविली नसल्याचे अधिकाऱयाकडून सांगण्यात आले.
स्कोल्ज आणि मॅक्रॉन यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्यासोबतच्या 75 मिनिटांच्या फोन कॉलदरम्यान युक्रेनमध्ये तत्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले, परंतु पुतीन अत्यंत कठोर भूमिकेत दिसून आल्याचे जर्मन सरकारच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
पुतीन आक्रमक
युक्रेनचे सैन्य स्वतःच्या नागरिकांना ढाल म्हणून वापरत आहे. जेलेंस्की स्वतः लपले असून नागरिकांचा जीव धोक्यात आणत आहेत. जोवर युक्रेन अटी मान्य करत नाही तोवर आम्ही मागे हटणार नसल्याचे पुतीन यांनी स्कोल्ज आणि मॅक्रॉन यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान म्हटले आहे.
रशियाकडून रसायनास्त्रांचा वापर शक्य
कीव्हवर कब्जा करण्यासाठी रशिया आता अंतिम हल्ल्याची तयारी करत आहे. रशिया युक्रेनच्या विरोधात रासायनिक अस्त्रांचा वापर करू शकतो असा दावा नाटोप्रमुखांनी केला आहे. याचदम्यान युक्रेनचे अध्यक्ष जेलेंस्की यांनी युक्रेन सैन्याच्या हालचालींबद्दल सोशल मीडियावर पोस्ट न करण्याचे आवाहन लोकांना केले आहे.









