प्रतिनिधी / कोल्हापूर
फोन टॅपिंग करून गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी सुरु असून भाजप कार्यकर्ते राज्यभर आक्रमक झाले आहेत. पण आता केवळ त्यांची चौकशी सुरु आहे. फडणवीस हे माजी मुख्यमंत्री असल्याने या पदाला एक दर्जा आहे. त्यामुळे पोलिस घरी जाऊन चौकशी करत आहेत. ईडी चौकशी न करता उचलून घेऊन जाते, तेव्हा तुम्ही काय बोलत नाही ? आता फोन टॅपिंगप्रकरणाची चौकशी सुरु आहे, कारवाई नाही. प्रत्येक गोष्टीचे राजकीय भांडवल करायचे हे भाजपने ठरवले आहे. त्यांची ही गोबेल्स निती असल्याचा आरोप अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे नेते मंत्री भुजबळ यांनी रविवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. त्यामुळे भाजपला आक्रमक होण्याची गरज नाही. भाजप नेते खोटे बोलतात, पण रेटून बोलतात. एकच गोष्ट ते सारखे बोलतात आणि जनतेची दिशाभूल करतात. ही तर गोबेल्स नीती आहे. जरी चार राज्यात भाजपाने बाजी मारली असली, तरी उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे 50 आमदार कमी झाले आहेत. त्यामुळे त्यांचा चढता सुरज हळूहळू खाली येईल असेही ते म्हणाले.
दरम्यान, नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप करत आहे याविषयी भुजबळ म्हणाले, नवाब मलिक यांच्यावर अन्याय झाला आहे. आम्ही राजीनामा घेऊन त्यांच्यावर अन्याय करणार नाही. कोर्टात पुरावे सादर होऊ देत. ते मुस्लिम आहेत, म्हणून ईडी 55 चे 5 लाख केले. पण त्यांचा 5 लाखाचा व्यवहार घेऊन दाऊदशी संबंध जोडला जातोय. मात्र पाच लाख तर ते पान खाऊन थुंकतात. असा टोलाही त्यांनी लगावला. दाऊद प्रकरणाला 30 वर्षे झाली. हजारो पानांचे चार्टशीट तयार झाले. या प्रकरणात काही लोकांनी फाशी झाली. काहींनी जन्मठेपेची शिक्षा झाली. कोठेही मलिकांचा उल्लेख नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
महाविकास आघाडीसरकार कोणीही पाडू शकत नाही
कोणत्या ना कोणत्या प्रकरणावरून भाजप सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी महाविकास आघाडी नेमकी कशी तयारी करत आहे, या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, त्रास देणे, अटक करणे, ईडी,सीबीआय, इनकम टॅक्स कारवाई करणे याचा पूरेपूर उपयोग भाजप करत आहे. मात्र, जोपर्यंत शरद पवार, उध्दव ठाकरे आणि सोनिया गांधी हे सरकारच्या बाबतीमध्ये ठाम आहेत तोपर्यंत हे सरकार कोणीही पाडू शकत नाही, असा सूचक इशारा यावेळी त्यांनी भाजपला दिला.








