सांगेवासियांची मागणी, तालुक्यावर 60 वर्षे अन्याय
प्रतिनिधी /पणजी
आगामी मंत्रिमंडळात सांगे तालुक्याला प्रतिनिधीत्व मिळावे, अशी जोरदार मागणी सांगे भागातून होत आहे. सांगे तालुका हा गोव्यातील एक समृद्ध असा तालुका आहे. हा तालुका गोव्याची तहान भागवितो. मोठय़ा प्रमाणात दुग्ध उत्पादन करतो. सर्वाधिक नारळ व काजू उत्पादन या तालुक्यात होते. सर्वाधिक भात उत्पादन, सर्वांधिक ऊस उत्पादन हे देखील याच तालुक्यातून होते. या तालुक्याने आतापर्यंत भाजपला चांगले आमदार मिळवून दिले. नव्याने निवडून आलेले सुभाष फळदेसाई हे सुशिक्षित व पदवीधर असून त्यांना मंत्रीपद मिळणे म्हणजे सांगे तालुक्यावर गेल्या 60 वर्षे झालेला अन्याय भरून काढण्यासारखे आहे. आजवर एकदाही सांगे तालुक्याला मंत्रीपद मिळू शकलेले नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आता सांगे तालुक्याला मंत्रीपद देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी सांगेतील जनतेची मागणी आहे. सर्व तालुक्यामंध्ये मंत्रीपदे गेली, मात्र सांगे तालुक्यानेच असा कोणता गुन्हा केला ! की या तालुक्याला एवढी वर्षे मंत्रीपद मिळू नये यामुळे आता या तालुक्यातील अन्याय दूर करण्याची संधी मुख्यमंत्र्यांना आहे. त्यांनी सुभाष फळदेसाई यांना मंत्रिमंडळात सामिल करून घ्यावे, अशी जोरदार मागणी सांगेतील नागरिकांनी केली आहे. सांगेला पुन्हा एकदा उपेक्षित ठेवू नका असे सांगेवासियांचे म्हणणे आहे.









