वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण
प्रतिनिधी /बेळगाव
विविध कार्यक्रमांसाठी राज्यपाल 3 दिवस बेळगाव दौऱयावर आहेत. त्यांच्या दौऱयादरम्यान ताफ्यासाठी वाहतूक रोखली जात आहे. परंतु त्यांचा ताफा येण्यापूर्वीच 15 ते 20 मिनिटे वाहतूक रोखली जात असल्यामुळे मंगळवारी व बुधवारी शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली. बुधवारी सकाळी गोगटे सर्कल ते मराठा मंदिरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
आरसीयू व व्हीटीयू या दोन विद्यापीठांचा पदवीदान समारंभ बेळगावमध्ये होत असल्याने यानिमित्त राज्यपाल मंगळवारी दुपारपासून बेळगाव शहरात आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. व्हीटीयू येथील विश्रामगृहामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात येताना त्यांच्यासाठी काँग्रेस रोड रिकामा करण्यात येत आहे. त्यांचा ताफा ज्यावेळी निघतो त्यावेळी इतर सर्व वाहतूक बंद केली जात आहे. बुधवारी सकाळी कार्यालयीन वेळेत कामावर निघालेल्या कर्मचाऱयांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला. गोगटे सर्कल, फिश मार्केट, धर्मवीर संभाजी चौक, यंदे खूट, चन्नम्मा चौक, सम्राट अशोक चौक या परिसरात वाहतूक कोंडी झाली.
केवळ शहरातच नव्हे तर महामार्गावरही वाहतूक रोखून ती सर्व्हिस रस्त्याने वळविण्यात आली. वेगाने येणारी वाहने महामार्गावर अडविली जात असल्यामुळे वाहनचालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. सर्व्हिस रोडने वाहने सोडून पुन्हा सुवर्णसौध येथून महामार्गावर वाहने हाकली जात होती.