विजय कुवळेकर यांचे प्रतिपादन : स्मृतिदिनानिमित्त चित्रप्रदर्शन : वरेरकर नाटय़ संघाच्या सभागृहात आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
के. बी. कुलकर्णी जेवढे श्रेष्ठ चित्रकर्मी होते, त्याहीपेक्षा माणूस म्हणून मोठे होते. कलेच्या माध्यमातून त्यांनी समाजाशी ऋणानुबंध जोडले. ते आज नसले तरी त्यांच्या चित्राकृती व शिष्यांवरील संस्कारांतून त्यांचे अस्तित्व चिरंतन राहणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी केले.
येथील वरेरकर नाटय़ संघाच्या सभागृहात चित्रकार के. बी. कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनाचे आयोजन केले होते. यावेळी कुवळेकर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य सोसायटीचे संस्थापक किरण ठाकुर होते. व्यासपीठावर चित्रकार मारुती पाटील, प्रभाताई कुलकर्णी आणि जगदीश कुंटे उपस्थित होते.
पुढे बोलताना विजय कुवळेकर म्हणाले, के. बी. मितभाषी पण मिश्किल होते. त्यांचे तत्त्वज्ञानाचे वाचन प्रचंड होते. वादविवादात अडकून पडण्यापेक्षा जीवनविषयक वैचारिक बैठक पक्की असावी, असे त्यांना वाटायचे. कलेविषयी पडताळणी करण्याची त्यांची दृष्टी होती. कलेचा पाया पारंपरिक असावा, याबाबत ते नेहमी आग्रही असायचे. विशेष म्हणजे माणसांची पारख ते चपखलपणे करीत. तत्त्वज्ञान आणि अध्यात्म विषयाचे त्यांचे आकलन प्रचंड होते. त्यांनी चित्राकृतींतून माणसांचा शोध घेण्याचा ध्यास घेतला होता.
के. बीं.नी त्यांच्या कलाकृतींतून सर्वार्थाने माणूस मांडला. वादांच्या प्रवाहातून काहीच साध्य होत नाही, याची जाणीव त्यांना होती. त्यामुळेच ते प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत. कलावंत हा कलेच्या माध्यमातून जगभर पोहोचला पाहिजे, हे सूत्र त्यांनी जोपासले. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या शिष्यांवर केलेले संस्कार आणि कलेतून त्यांचे अस्तित्व आजही चिरंतन असल्याचे मत कुवळेकर यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी के. बीं. समवेतच्या आठवणींना उजाळा दिला.
बेळगावातील कलाकारांची महाराष्ट्राकडून उपेक्षाच
अध्यक्षस्थानावरून बोलताना लोकमान्य सोसायटीचे संस्थापक किरण ठाकुर म्हणाले, के. बी. हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. सीमाप्रश्न सुटणार का? हा ध्यास त्यांनी शेवटपर्यंत बाळगला. महाराष्ट्राने मात्र सीमाप्रश्न आणि बेळगावातील कलाकारांची उपेक्षाच केली. ते आशावादी होते. स्वतःला प्रसंगी कमी लेखून त्यांनी त्यांच्या शिष्यांना प्रोत्साहित केल्यामुळे आज हा गोतावळा जमला आहे.
मराठी माणूस कौतुकाच्या बाबतीत नेहमीच पडतो. कलाकारांनी मास्टर ऑफ वन बनल्याशिवाय जागतिक कीर्ती मिळणार नाही. गोव्यातील कला अकादमीच्या धर्तीवर बेळगावात ‘लोकमान्य’च्या माध्यमातून आर्ट गॅलरी व ऑडिटोरियम तसेच गोव्यातही ‘तरुण भारत ट्रस्टकडून आर्ट गॅलरी सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी जागेची तरतूद झाली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. के. बी. निःस्वार्थी होते. त्यांनी बेळगावकरांचे कलाजीवन समृद्ध केल्याचे सांगितले.
कार्यक्रमात विविध पुरस्कार व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. के. बी. जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रकार मारुती पाटील यांना देण्यात आला. जॉन फर्नांडिस यांनाही मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी एडवीन फर्नांडिस यांनी पुरस्कार स्वीकारला. कलागौरव पुरस्कार संतोष पेडणेकर व किरण हणमशेठ यांना देण्यात आला. या सर्वांनी के. बी. कुलकर्णी यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करताना गुरुच्या नावाने पुरस्कार मिळणे हे भाग्य असल्याचे सांगितले.
चित्रकला स्पर्धेत पहिल्या गटात प्रथम क्रमांक पटकाविलेली ऋतिका एनमरली, द्वितीय श्रेयस कडोलकर, तृतीय प्रथमेश सुतार, उत्तेजनार्थ गोविंद गावडे तर दुसऱया गटातून प्रथम क्रमांकप्राप्त खुशी बेळगोजी, द्वितीय उदय सुतार, तृतीय गौतम हुंदरे व उत्तेजनार्थ पारितोषिक स्नेहा मोडेकर यांचा प्रमाणपत्र व रोख बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी चित्रप्रदर्शनाचा आस्वाद चित्रकलाप्रेमींनी घेतला.