सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
कोल्हापूर प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे सर्कीट बेंच कोल्हापुरात व्हावे, यासाठी मंगळवारी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तींना कोल्हापूर खंडपीठाबाबत पत्र पाठवणार असल्याची ग्वाही दिली.
कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच सर्कीट बेंच व्हावे यासाठी गेली 35 वर्षाहून अधिक काळ लढा सुरू आहे. गेल्या काही महिन्यापासून हा लढा आता नव्याने तीव्र करण्यात आला आहे. गुरुवार (2 गुरुवारी) रोजी पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकारातून मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. यामध्ये सहा जिह्यातील खासदार, आमदार, मंत्री, लोकप्रतिनिंधीचा समावेश होता. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नऊ मार्च पूर्वी मुख्य न्यायमूर्तींशी सकारात्मक चर्चा करावी अशी मागणी करण्यात आली होती.
मंगळवारी मुंबई येथे सहा जिह्यातील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीस विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, मंत्री विश्वजीत कदम, मंत्री शंभूराजे देसाई, यांच्यासह आमदार खासदार उपस्थित होते.
10 तारखेच्या बैठकीकडे नजरा
न्यायमूर्तींनी खंडपीठ कृती समितीबरोबर 10 मार्चला मुंबई उच्च न्यायालयात भेटीची वेळ दिली आहे. त्या भेटीसाठी समितीचे निवडक शिष्टमंडळ बुधवारीच मुंबईला रवाना होणार असल्याचे ऍड. ताटे-देशमुख यांनी सांगितले. या भेटीमुळे सहा जिह्यातील वकील, पक्षकारांसह तमाम नागरिकांच्या सर्कीट बेंचबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.