पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्याबद्दल गोल्याळीतील शिष्यांकडून सद्गुरुंचा जयघोष
वार्ताहर /कणपुंबी
गोवा येथील पद्मनाभ सांप्रदायाचे आध्यात्मिक गुरु ब्रह्मेशानंदाचार्य यांना मिळालेल्या भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराप्रीत्यर्थ गोल्याळी येथील शिष्यांनी व भक्तांनी स्वामींचे दर्शन घेऊन आनंदोत्सव साजरा केला.
श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर तथा आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक धर्मगुरु धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींना भारत सरकारद्वारा आध्यात्मिक क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्यानंतर विविध भागातून संत-महंत, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील नेते पूज्य स्वामीजींप्रती असलेले आपले प्रेम, भावना व्यक्त करत आहेत. गोवा, महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यासह राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पूज्य स्वामीजींचे शिष्य-अनुयायी आहेत.
कर्नाटक भागातील सांप्रदायाच्या गोल्याळी शाखेतील शिष्यांनी पूज्य स्वामीजींना पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्याबद्दल श्री सुशेण दत्त मठात पूज्य स्वामीजींचे दर्शन घेऊन पूज्य गुरुपीठाप्रति आपली नि÷ा व भावना व्यक्त करून पूज्य सद्गुरुंच्या जयघोषाने आनंदोत्सव साजरा केला.
दरम्यान, शाखा गोल्याळीतील शिष्यांनी तपोभूमी गो-शाळेत सेवा करून समाधान व्यक्त केले. तद्नंतर श्री सुशेण दत्त मठ, हातुर्लीत दत्त गुरुवार भक्ती उत्सवाला उपस्थित राहून पूज्य स्वामीजींचे दर्शन घेतले. कर्नाटक क्षेत्राचे क्षेत्रीय प्रमुख रघुनाथ उत्तुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोल्याळी येथे पद्मनाभ सांप्रदायाची शाखा कार्यरत आहे. याप्रसंगी रामा टेमकर, संजय कलंगुटकर, सामाजिक विभाग पदाधिकारी, क्षेत्रीय प्रमुख आदी उपस्थित होते.









