शहर विकास आणि वसुली विभागामध्ये समन्वयाचा अभाव
प्रतिनिधी/ सातारा
एका बाजूला सातारा पालिकेच्या वसुली विभागाला दिलेले उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी पथक कामाला लागले आहे. परंतु हे काम करत असताना अनेक त्रुटी जाणवत आहेत. त्यामध्ये शहर विकास विभाग आणि वसुली विभाग यांच्यात समन्वय नसल्याने सेव्हन स्टारमधील सुमारे 87 गाळे धारकांना तब्बल दोन वर्षाच्या अतिरिक्त कराची नोटीस बजावली गेल्याने खळबळ उडाली आहे. वसुली विभागाला अलिशान गाडय़ा वसुलीसाठी दिल्या गेल्या आहेत. तरीही शहरातील धनाढय़ सुमारे 8 हजार थकबाकीदार असून त्यातील अनेकांना करात सवलत देण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यावरुन वसुली विभागावर नेमके कोणाचे पावशेर आहे याचीच सध्या चर्चा सुरु आहे.
पालिकेचा कर वेळेवर भरला तर तो विकासकामाकरता उपयोगात आणता येतो असे त्यामागचे सूत्र आहे. मात्र, दरवर्षीच पालिकेच्या वसुली विभागाचे पथक दिलेले उद्दिष्ठ साध्य करण्यासाठी पळत असते. ते पूर्ण करताना मोठी दमछाक होते. आताही असाच प्रकार सुरु आहे. सेव्हन स्टार या इमारतीमध्ये जे गाळेधारक आहेत. त्या गाळेधारकांना पालिकेच्या कराची नोटीस हाती पडताच आश्चर्याचा धक्का बसला आहे. जेव्हा गाळा ताब्यात नव्हता तेव्हापासूनचे भाडे आकारण्यात आले असल्याने त्या 87 गाळे धारकांनी याबाबत संबंधिताना विचारणा केली असल्याचे समजते. शहर विकास विभागाकडून भोगवटा प्रमाणपत्र वेळेत दिल्याची माहिती वसुली विभागास देणे आवश्यक असते. परंतु ती माहिती न दिल्याने अशा प्रकारच्या नोटीस पोहचल्या असल्याचे समजते. त्यामुळे ज्यादा कर वसुली करण्याचा या फंडय़ामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, दुसऱया बाजूला वसुली पथकाकडे अलिशान गाडय़ा दिमतीला दिल्या गेल्या आहेत. या गाडय़ाना भाडेही ज्यादा असणार असून त्या प्रमाणे वसुली तरी होतेय काय असाही सवाल उपस्थित होत आहे.
त्या 8 हजार थकबाकीदारांपैकी काही जणांना सवलत देण्याच्या हालचाली? नियमीत कर भरणाऱयाला सवलत देण्याऐवजी शहरात सुमारे 8 हजार जण कर चुकवेगिरी करणारे आहेत. त्यांची यादीही वसुली विभागाकडे आहे. त्यांच्यावर कडक कारवाई केली जात नाही. उलट त्यांना सवलत देण्याच्या हालचाली सुरु असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे









