प्रतिनिधी / मेढा :
जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावरील फुलांच्या संरक्षणासाठी घालण्यात आलेले कंपाऊंड आता वन्यप्राण्यांना अडसर ठरू लागले आहे. शुक्रवार दि. 4 मार्च रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास कास पुष्प पठारावर एक रानगवा चरत चरत पठारावरील डांबरी रस्त्यावर आला. बराच वेळ हा रानगवा रस्त्याने पुढे मागे करू लागला. मात्र दोन्ही बाजूला फुलांच्या संरक्षणासाठी घालण्यात आलेले कंपाउंड असल्याने या रानगव्याला जंगलात इकडे तिकडे जाता आले नाही. अर्धा तास होऊन अधिक काळ हा रानगवा जंगलात जाण्यासाठी धडपड करत होता. मात्र दोन्ही बाजूला असलेले कंपाऊंड त्याला अडसर ठरत होते.
कास पठारावरून सातारा बामणोलीकडे ये-जा करणारे प्रवासी या रानगव्याचे फोटो काढत होते तर काही बराच वेळ व्हिडिओ करत होते. फुलांच्या संरक्षणासाठी घालण्यात आलेले कंपाऊंड वन्यप्राण्यांसाठी अडसर ठरत असल्याने सदरचे कंपाऊंड हे फुलांच्या हंगाम कालावधी पुरते मर्यादित असावे, असे मत आता पर्यावरण प्रेमी यांच्याकडून व्यक्त केले जात आहे. अनेक वन्य प्राण्यांचा मुक्त संचार या कंपाउंडमुळे थांबला आहे. त्यामुळे सदरचे कंपाउंड हे जसे फुलांच्या संरक्षणासाठी आहे तसेच ते वन्यप्राण्यांच्या ये-जा करण्यास अडथळा देखील ठरत आहे. रानगवा, सांबर, भेकर, रानडुक्कर अशा मोठय़ा प्राण्यांना या कंपाउंडमुळे अलीकडे पलीकडे जाता येत नाही. शेवटी कास पठारावर आलेला रानगवा हा रस्त्यावरील प्रवाशांनी एका ठिकाणी कंपाउंड तुटलेले होते. त्या ठिकाणाहून त्याला जंगलात सोडण्यात आले. असेच प्राणी रात्रीच्या वेळेस पठारावर येतात व त्यांना अलीकडे पलीकडे जाता न आल्याने वाहन चालकांची शिकार होतात. तेव्हा वनविभागाने कास पुष्प पठारावरील कंपाउंडबाबत योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेण्याची आता गरज भासू लागली आहे.









