काँगेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी शुक्रवारी वाराणसीच्या विश्वनाथ मंदिरात पूजा केली आहे. दोन्ही नेते उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानापूर्वी प्रचारासाठी येथे वाराणसीत आले होते. दोन्ही नेत्यांनी विश्वनाथ मंदिरात जाऊन शास्त्रोक्त पद्धतीने पूजन केले. त्यानंतर त्यांनी तेथे प्रार्थनाही केली, अशी माहिती देण्यात आली.
काँगेस पक्षाने उत्तर प्रदेशात दुसऱया टप्प्यातील मतदानानंतर फारसा प्रचार केलेला नाही. प्रियांका गांधीही दुसऱया टप्प्यानंतर विशेष सक्रीय नव्हत्या असे दिसून येते. मात्र, सातव्या आणि अखेरच्या टप्प्याच्या आधी त्यांनी वाराणसीला भेट देऊन आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असताना, प्रत्येक पक्षाने प्रचारासाठी वाराणसी हेच केंद्र निवडल्याने वाराणसीत शुक्रवारी अनेक महनीय नेते जमा झाले होते. त्यामुळे विश्वनाथ मंदिरातही पूजा करण्यासाठी त्यांची उपस्थिती होती.









