रावळपिंडी / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानच्या भूमीत 24 वर्षांनंतर प्रथमच पहिली कसोटी मालिका खेळणार असून या मालिकेसाठी दोन्ही मंडळांच्या वतीने बेनॉ-कादिर चषकाचे अनावरण करण्यात आले. उभय संघातील पहिली कसोटी उद्यापासून (शुक्रवार दि. 4) खेळवली जाणार आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम व ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यांनी बुधवारी पहिल्या कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर बेनॉ-कादिर चषकाचे अनावरण केले. या कसोटी मालिकेतील तिसरी व शेवटची कसोटी लाहोरमध्ये खेळवली जाणार असून तेथेच मालिकेतील विजेत्यांचा सदर चषक प्रदान करुन सन्मान केला जाईल.
रिची बेनॉ व अब्दुल कादिर हे विभिन्न पर्वातील दोन दिग्गज खेळाडू राहिले आहेत. ऑस्ट्रेलियाने 1959 मध्ये पाकिस्तानचा पहिला पूर्ण दौरा केला, त्यावेळी बेनॉ यांच्याकडे नेतृत्वाची धुरा होती. ती मालिका ऑस्ट्रेलियाने 2-0 फरकाने जिंकली. कादिर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 11 कसोटी सामने खेळत 45 बळी घेतले. यातील 33 बळी 1982 व 1988 मध्ये अनुक्रमे किम हय़ुजेस व ऍलन बोर्डरच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध घेतले होते.
वैयक्तिक स्तरावर, बेनॉ यांनी 1952 ते 1964 या कालावधीत 248 बळी घेतले तर कादिर यांनी 1977 ते 1990 या कालावधीत 67 कसोटी सामन्यात 236 बळी घेतले. बेनॉ यांचा 2009 मध्ये आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये तर कादिर यांचा 2021 मध्ये पीसीबी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. बेनॉ-कादिर चषक मालिकेपूर्वी, पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्यात 25 कसोटी मालिका झाल्या असून यात ऑस्ट्रेलियाने 13 वेळा तर पाकिस्तानने 7 वेळा मालिकाविजय संपादन केला आहे.









