इजिप्तमधील स्पर्धेत रशियन नेमबाजांना मज्जाव
वृत्तसंस्था/ म्युनिच, जर्मनी
आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा फेडरेशनने (आयएसएसएफ) त्यांच्याकडून आयोजित केल्या जाणाऱया सर्व नेमबाजी स्पर्धांत सहभागी होण्यास रशिया व बेलारुसच्या खेळाडूंना बंदी घातली आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर जगभरातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून जगाभरातील विविध विश्व क्रीडा फेडरेशन्सनी त्यांच्यावर वरीलप्रमाणे कारवाई सुरू केली आहे.
सध्या इजिप्तमधील कैरो येथे आयएसएसएफची विश्वचषक नेमबाजी स्पर्धा सुरू असून मंगळवारपर्यंत त्यात रशियन खेळाडूंनी भाग घेतला होता. अशा स्थितीतच आयएसएसएफने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रशियन नेमबाज आता या स्पर्धेच्या उर्वरित भागात सहभागी होऊ शकणार नाहीत, असेच त्यातून सूचित करण्यात आले आहे. ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) कार्यकारी मंडळाने शिफारस केल्यानंतर आणि आयओसी अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर आयएसएसएफने रशियन फेडरेशन व बेलारुसच्या खेळाडूंना या चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे आयएसएसएफने म्हटले आहे. ‘हा निर्णय 1 मार्चपासून (भारतीय वेळ रात्री 8.30 पासून) लागू करण्यात आला आहे,’ असेही त्यांनी म्हटले आहे.
विशेष बाब म्हणजे आयएसएसएफच्या प्रमुख पदांवर दोन रशियन धनाढय़ांचाच समावेश आहे. अब्जाधीश असलेले ब्लादिमिर लिसिन अध्यक्षपदी असून रशियातील अतिशय श्रीमंत व्यक्तींपैकी ते एक आहेत तर सरचिटणीसपद अलेक्झांडर रॅटनर सांभाळत आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दिलेल्या निर्देशानुसार हा निर्णय घेतला गेला असून अनेक क्रीडा फेडरेशन्सनी रशियन खेळाडू व पदाधिकाऱयांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सहभागी होण्यास बंदी घातली आहे. विश्व क्रीडा क्षेत्राच्या अखंडत्वाचे रक्षण करण्याची तसेच सहभागी स्पर्धंकांच्या सुरक्षिततेसाठी, अशी कारवाई करणे आवश्यक असल्याचे आयओसीने म्हटले आहे.
गेल्या आठवडय़ात रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आयओसी कार्यकारी समितीने सोमवारी सर्व आंतरराष्ट्रीय फेडरेशन्स व आयोजकांना रशिया व बेलारुच्या खेळाडूंना स्पर्धेसाठी निमंत्रित न करण्याची शिफारस केली होती. रशियाला मदत केल्याबद्दल बेलारुसवर हे निर्बंध घालण्यात आले आहेत. नोव्हेंबर 2018 पासून लिसिन हे आयएसएसएफचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. त्यांनी या पदासाठी इटलीच्या लुसियानो रॉसी यांचा केवळ 4 मतांनी पराभव केला होता. सरचिटणीस रॅटनर देखील युरोपियन नेमबाजी कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष आहेत.
यावर्षी रशियात होणाऱया युरोपियन नेमबाजी चॅम्पियनशिपचे यजमानपदाचे हक्कही आता काढून घेण्यात आले आहेत. येत्या ऑगस्टमध्ये ही स्पर्धा मॉस्कोमध्ये होणार होती. याशिवाय पुढील स्पर्धा आयोजित करण्याची संधीही त्यांना दिली जाण्याची शक्यता नाही. याआधी फिफा, युफा (फुटबॉल), आयएचएफ (हॉकी) यांनीही रशिया व बेलारुसवर बंदी घातली आहे.









