पंतप्रधान मोदींचे ‘टेक्नॉलॉजी एनेबल्ड डेव्हलपमेंट’ वेबीनारमध्ये प्रतिपादन
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्मिती आणि सेवांचा कानाकोपऱयात पुरवठा यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात ‘आत्मनिर्भरता’ प्राप्त करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते ‘टेक्नॉलॉजी एनेबल्ड डेव्हलपमेंट’ या विषयावर आयोजित वेबीनारमध्ये बोलत होते.
सध्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे युग आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे विषय याच्याशी जोडले गेलेले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केल्यासच वेगवान पुरवठा आणि नागरीकांचे सबलीकरण साध्य होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात भारताने इतर देशांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच स्वयंपूर्ण असणे अत्यावश्यक आहे. संपर्कतंत्रज्ञानात झालेल्या क्रांतीमुळे रोजगाराची नवी साधने मानवाच्या हाती दिली आहेत. म्हणून हे तंत्रज्ञान आपल्याकडेही असणे ही काळाची मागणी आहे. विशेषतः मोबाईल क्षेत्रातील 5-जी तंत्रज्ञान यासाठी उपयुक्त ठरणार आहे. केंद्र सरकारने संपर्क तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी 2022 मध्ये 5 जी तंत्रज्ञानासाठी व्यापक स्पेक्ट्रम लिलाव करण्याची योजना सज्ज केली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
बॉक्स
नव्या तंत्रज्ञानासाठी द्वारे खुली संपर्क क्षेत्रात नवे तंत्रज्ञान निर्माण झाले पाहिजे. यामुळे पुरवठा साखळी बळकट होईल. पायाभूत सुविधांच्या विकासातही संपर्क तंत्रज्ञान महत्वाचे आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचे अधिष्ठान भारतात असावयास हवे. तंत्रज्ञान विकासाची सोय करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. 2022-2023 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात एआय, जिओस्पेटियल सिस्टिम्स, ड्रोन्स, सेमीकंटक्टर्स, जनुकीय शास्त्र, पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान यांवर आवश्यक तो भर देण्यात आला आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.









