सप अध्यक्ष अखिलेश यांचे आश्वासन: सैन्यभरतीसाठी केंद्रासोबत चर्चा करणार
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तरप्रदेशच्या जौनपूर येथे प्रचारसभेला संबोधित केले आहे. पहिल्यांदाच जनता निवडणूक लढवत असल्याचे पाहतोय. भाजप म्हणायला जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, परंतु काम आणि त्याने दिलेली आश्वासने पाहिल्यास भाजप जगातील सर्वात खोटारडा पक्ष दिसून येईल. भाजप सरकार शेतकऱयांना वेळेत खतांचा पुरवठा करू शकलेले नाही. खत मिळाले तर पिशवीतील 5 किलो खतांची चोरी झाली. भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास खतांच्या पिशवीतून 10 किलोंची चोरी करतील. समाजवादी पक्ष सत्तेवर आल्यास तरुणाईला भरतीप्रकरणी वयोमर्यादेत सूट देण्यात येणार असल्याची घोषणा अखिलेश यांनी केली आहे.
भाजपने 2022 पर्यंत शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते पूर्ण झालेले नाही. भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास 200 रुपयांमध्ये एक लिटर पेट्रोल विकले जाणर असल्याचा दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि मोबाईल वाटल्याचे ऐकले आहे. परंतु स्वतःला या गोष्टी वापरता न येणारे योगी लोकांना काय देतील? लॅपटॉप, मोबाइल आणि इंटरनेट न समजणारा व्यक्ती राज्य कसे चालविणार? समाजवादी पक्षाचे सरकार तरुण-तरुणींना 22 लाख नवे रोजगार माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात मिळवून देणार असल्याचे अखिलेश म्हणाले.
समाजवादी पक्ष सत्तेवर आल्यास नव्या भरतींवर भर देणार आहे. मागील 3 वर्षांमध्ये कोरोनामुळे तरुण-तरुणींचा वेळ वाया गेला आहे. याचमुळे उत्तरप्रदेशात आम्ही सत्तेवर आलो तर वयोमर्यादेत सूट देण्यात येईल तसेच केंद्र सरकारसोबत सैन्य भरतीदरम्यान वयोमर्यादेत सूट देण्यासाठी चर्चा करणार असल्याचे विधान त्यांनी केले आहे.
समाजवादी पक्षाने जौनपूरला वैद्यकीय महाविद्यालय मिळवून दिले. समाजवादी पक्षाचे सरकार आल्यास गरीबांना येथे मोफत उपचार मिळवून दिले जाईल. मागील वेळी भाजपने मत मागताना मोफत सिलिंडर वाटले होते. परंतु आता भाजप मत मागण्यासाठी आला तर त्याला सिलिंडरचा दर विचारा अशी टीका अखिलेश यांनी केली आहे.









