काँग्रेस उमेदवार सहकुटुंब राजस्थानात ः कॅप्टन यांच्या पक्षाचा दावा
पंजाबमध्ये 10 मार्च रोजी मतमोजणीपूर्वीच राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पंजाब लोक काँग्रेस या पक्षाने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. कॅप्टन यांच्या पक्षाचे प्रवक्ते प्रितपाल सिंह बलियेवाल यांनी काँग्रेसचे उमेदवार सहकुटुंब राजस्थानात का आहेत असा प्रश्न उपस्थित केला आहे.
निकाल लागण्यापूर्वीच उमेदवारांना फूटू न देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे का? आगामी दिवसांमध्ये काँग्रेस उमेदवारांची छायाचित्रे जोधपूर आणि जैसलमेर येथून दिसून येतील. आप उमेदवारही दार्जिलिंगची सैर करत असल्याचे म्हणत बलियेवाल यांनी राजकीय वातावरण तापविले आहे.
कॅप्टन यांच्या पक्षाला रिजॉर्टची माहिती असल्यास त्याचे नाव त्यांनी जाहीर करावे. काँग्रेसचे उमेदवार कुठेच गेले असून अन्य राजकीय पक्षांकडून केवळ लोकांची दिशाभूल केली जातेय. काँग्रेस पंजाबमध्ये बहुमतातील सरकार स्थापन करणार असल्याचे काँग्रेस नेते कुलदीप वैद यांनी म्हटले आहे.
मतमोजणीपूर्वी काँग्रेस स्वतःच्या उमेदवारांना राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये हलवू शकते अशी चर्चा पंजाबमध्ये सुरू आहे. तर आम आदमी पक्ष देखील स्वतःच्या उमेदवारांना बंगालमध्ये पाठविण्याच्या तयारीत आहे. परंतु काँग्रेस आणि आपने या चर्चांना केवळ अफवा ठरविले आहे.
मतदानाचा ट्रेंड आणि टक्केवारी पाहिल्यास कुठल्याच पक्षाला स्वबळावर बहुमत मिळणार नसल्याची चर्चा आहे. पंजाबमध्ये आघाडी सरकार सत्तेवर येणार असल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. अशा स्थितीत आमदारांचा घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.









