ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यातील 14 जिल्हे पूर्णपणे निर्बंधमुक्त करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून यासंदर्भात नवी नियमावली जारी करण्यात आली असून, या 14 जिल्ह्यांमध्ये चित्रपटगृह, नाटय़गृह, रेस्टॉरंट, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या 4 मार्चपासून नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू होईल. इतर जिल्ह्यांमध्ये 50 टक्के क्षमतेची अट कायम असणार आहे.
निर्बंध शिथिल करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूरचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमागृह, रेस्टॉरंट, बार, क्रीडांगण, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळे, नाटय़गृह, पर्यटनाची ठिकाणे, मनोरंजन पार्क आदी ठिकाणांना 100 टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांसाठी 50 टक्के क्षमतेची मर्यादा असेल.
तसेच या 14 जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. खासगी आणि सरकारी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करता येतील. जिल्ह्यांतर्गत आणि राज्यांतर्गत प्रवासासाठी पूर्ण लसीकृत झालेल्या व्यक्तीला परवानगी असेल. पूर्ण लसीकृत नसलेल्या व्यक्तीला निगेटिव्ह आरटीपीसीआर अहवाल प्रवासासाठी बंधनकारक असणार आहे.








