प्रतिनिधी / सांगली
महाराष्ट्र राज्य सरकार (महाविकास आघाडी) ने आरक्षण व इतर मागण्याबाबत मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आपल्या मागण्यांसाठी व सरकारला जागे करण्यासाठी युवराज खासदार संभाजीराजे मुंबई येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा सांगलीच्यावतीने डॉ. संजय पाटील यांचे सांगली येथे आमरण उपोषण सुरू आहे. त्यास पाठिंबा देण्यासाठी सांगलीतील शिवपुतळ्याजवळ समस्त मराठा समाजाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई येथे सुरू असलेल्या खासदार संभाजीराजेंच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सांगलीच्या शिवपुतळा परिसरात मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. पाटील यांचे उपोषण सोमवारपासून सुरू झाले आहे. यावेळी शहरातील समस्त मराठा नेत्यांनी त्यांना भेटून सक्रिय पाठिंबा दिला. यावेळी ‘आरक्षण मिळालंच पाहिजे, एक मराठा लाख मराठा, आदी घोषणांनी परिसर दुमदुमला.
पाठिंबा देण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, माजी उपमहापौर धीरज सुर्यवंशी, भाजपा युवा नेते पै. पृथ्वीराज पवार, सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर, माजी उपयुक्त श्रीरंग पाटील, गटनेता विनायक सिंहासने, माजी उपमहापौर युवराज बावडेकर, अतुल माने, प्रियानंद कांबळे, ऋषिकेश पाटील, राहुल पाटील, बजरंग यादव, भारत कुबडगे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.