भाजप उत्तर प्रदेश जिंको अथवा हारो, पण पुढील महिन्यातील पाच राज्यांच्या निकालाने नक्की एक मात्र होणार आहे. या राज्यांतील निकाल काहीही लागो पण त्याचा परिणाम देशाचे राजकारण बऱयापैकी तरुण होण्यात होणार आहे. एक्काहत्तर वर्षाचे नरेंद्र मोदी हे गेली साडेसात वर्षे देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. दिग्गज अभिनेते अशोककुमार यांच्याप्रमाणे मोदी हे सदाबहार नेते राहिले आहेत आणि राहणार आहेत. ते कोणत्या पदावर असोत अथवा नसोत पण जगातील सर्वात मोठय़ा पक्षाचे राजकारण त्यांच्याभोवतीच फिरत राहणार आहे. ‘मोदी हैं तो मुमकिन हैं।’ या त्यांच्या भक्तांच्या घोषणेप्रमाणे मोदी म्हणतील ती भाजपकरता पूर्व दिशा राहणार आहे. भाजप उत्तर प्रदेश जिंकली तर ती मोदींमुळे जिंकेल आणि हारली तर ती योगी आदित्यनाथ यांच्यामुळे असे पक्षाचे टीकाकार देखील कबुल करतात. काही झाले तरी मोदींचा जलवा कायम राहणार आहे याची ही पावतीच.
पण जुनी पिढी आता उताराला लागली आहे. मनमोहन सिंग 89 वर्षाचे आहेत तर शरद पवार 81. देवे गौडा 88चे तर सोनिया गांधी पंचाहत्तरीच्या. तसेच नवीन पटनाईक देखील. मुलायम सिंग यादव 82 तर फारूक अब्दुल्ला 84. लालकृष्ण अडवाणी 94 आणि मुरली मनोहर जोशी 88 यांना सत्ताधारीच विसरले आहेत असे दिसत आहे.
साठी मध्येच अरुण जेटली आणि सुषमा स्वराज स्वर्गवासी झालेले आहेत. 75ला पोचलेल्या कमल नाथ आणि दिग्वजिय सिंग यांचे राजकारण उतरणीला लागले आहे. सत्तरी पार केलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे बदलत्या राजकारणात भाजपला अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्षांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनण्याचा डाव खेळत आहेत अशी चर्चा उफाळून आली आहे. त्यात कितपत तथ्य हे येणारा काळच दाखवेल. नितीश यांचे राजकारण देखील संपायला आले आहे याचीच ही एक निशाणी आहे. या सरत्या पिढीतील पवारच सर्वात जास्त सक्रिय आहेत तर सोनियाना राहुलला एकदा पंतप्रधान झालेले बघायचे आहे.
अशावेळी या पाच राज्यांच्या राजकारणाने एक नवीन नेतृत्व उदयाला येत आहे जे उद्याच्या भारताचे नेतृत्व करू शकते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे केवळ 49 वर्षाचे आहेत. ते या निवडणुकीत जिंकोत अथवा हारोत, किमान 20 वर्षे तरी ते राजकारणात राहणार आहेत. तीच गोष्ट त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी अखिलेश यादव यांची. ते तर योगींपेक्षा एक वर्षाने लहान आहेत. मायावती 66 वर्षाच्या असल्या तरी राजकीय दृष्टय़ा थकलेल्या वाटत आहेत. त्यांच्यातील रणरागिणी गायब झाली आहे. हे किती खरे वा किती फसवे हे 10 मार्चला कळणार आहे. भाजपला बहुमत मिळाले नाही तर उत्तर प्रदेशवर आपली पकड टिकवायला मायावतींना देखील मुख्यमंत्री केले जाण्याची एक शक्मयता राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.
भाजपचे खंदे विरोधक असलेले राहुल गांधी 51 वर्षाचे तर त्यांची बहीण प्रियंका त्यांना दोन वर्षानी लहान आहे. क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाले तर राहुल यांना राजकीय गोलंदाजी करताना लाईन आणि लेंग्थ बऱयापैकी सापडू लागली आहे. हे कितपत चूक अथवा बरोबर हे पंधरवडय़ात दिसणार आहे. गांधी घराण्यातील असूनही भाजपात असलेले वरूण गांधी हे केवळ 41 वर्षांचे आहेत, अभ्यासू नेता म्हणून ओळखले जात आहेत आणि न घाबरता आपली मते स्पष्टपणे मांडत आहेत. आजच्या राजकीय वातावरणात हे एक साहसच आहे. ज्या अमित शहा यांना मोदींचे ‘नंबर दोन’ मानले जाते ते सत्तावन्न वर्षांचे आहेत.
पंजाबमध्ये पुढील सरकार स्थापन करण्याची स्वप्ने बघणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे केवळ 53 वर्षांचे आहेत. त्यांच्या आम आदमी पक्षाचे मुख्य मंत्रिपदाचे उमेदवार खासदार भगवंत मान हे त्यांच्यापेक्षा पाच वर्ष छोटे आहेत. राहुल यांनी काँग्रेसचे पंजाबमधील मुख्यमंत्री बनवलेले चरणजित सिंग चन्नी यांनी अल्पावधीत आपल्या नेतुत्वाची चमक दाखवली आहे ते 58चे आहेत.
बिहारमध्ये नितीशकुमार यांना घाम फोडणारे तेजस्वी यादव केवळ 32 वर्षाचे तर ज्यांचा भाजपबरोबर जवळजवळ काडीमोड झाला आहे ते चिराग पासवान हे 39चे आहेत. एव्हढय़ा लहान वयात तेजस्वी हे बिहारमधील विरोधी पक्ष नेते बनले आहेत. पण मुलगा मात्र बिहारचा भावी नेता समजला जातो. कन्हैया कुमारना काँग्रेसमध्ये प्रवेश दिल्याने तेजस्वी तसेच लालू बिथरले आहेत असे बोलले जाते. राहुल गांधींनी काँग्रेसला बिहारमध्ये परत स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी कन्हैयांना आणले आहे असे मानले जाते.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंदरशेखर राव हे राष्ट्रीय राजकारणात भाजपच्या विरोधात आघाडी बनवण्याच्या उद्योगाला लागले आहेत त्याचे एक कारण म्हणजे त्यांना त्यांचा मुलगा के टी रामा राव याला आपली हैद्राबादमधील गादी सोपवायची आहे. 68-वर्षाचे चंद्रशेखर राव यांना जवळ जवळ त्यांच्याच वयाच्या असलेल्या ममता बॅनर्जींप्रमाणे पुढील पंतप्रधान बनायचे आहे. त्यांचा 34 वर्षाचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी तृणमूल काँग्रेसमधील उगवते नेतृत्व आहे. तेलंगणाच्या शेजारील आंध्र प्रदेशमध्ये जगन मोहन रेड्डी मुख्यमंत्री आहेत ते केवळ 49चे आहेत.
भाजपने देखील तरुणांना भरपूर वाव दिला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि किरण रिजुजु हे पन्नाशीच्या आतील आहेत. तामिळनाडूमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन्नमलाई कुप्पुस्वामी हे माजी आयपीएस अधिकारी असून 40च्या आतील आहेत तर युवा मोर्चाच्या तेजस्वी सूर्यानी नुकतीच तिशी पार केली आहे. राहुल गांधींनी राजकारणात तरुण नेत्यांची एक फौजच आणल्याने म्हातारे अर्क त्यांच्याविरुद्ध उठलेत.
तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री एम के स्टालिन यांचा 44 वर्षाचा मुलगा उदयनीधी हा द्रमुकचा आमदार आहे. वडिलांनी त्याला अजून मुख्यमंत्री बनवले नसले तरी साक्षात पंतप्रधानांनी निवडणूक प्रचारात उदयानिधि हे द्रमुकचे ‘क्राऊन प्रिन्स’ आहेत असा त्यांना शालजोडीतील मारला होता.
राजकारणातील तरुणाने चाळीशी गाठलेली असते ही गोष्ट अलाहिदा. या ‘तरुणातील’ किती जण बाजी मारणार हे येणारा काळ दाखवणार आहे. देशातील राजकारण झपाटय़ाने बदलत आहे. तरुण होत चालले आहे.
देशातील राजकारण झपाटय़ाने बदलत आहे. तरुण होत चालले आहे.
सुनील गाताडे








