अभिनेत्री कंगना रनौत पहिल्या दिवसापासून आलिया भट्ट स्टारर ‘गंगूबाई काठियावाडी’ला टार्गेट करत आहे. विशेष म्हणजे आलियाचा हा चित्रपट प्रदर्शित होताच कंगनाचा तिच्याबाबतचा दृष्टिकोन बदलला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, चित्रपट माफियांकडून चांगल्याची अपेक्षा नव्हती, पण त्यांचे काम कौतुकास्पद आहे. त्यामुळे एकाअर्थी कंगनाने आलियाचे काम बघून तिला दिलेली ही पावतीच आहे असे म्हणावे लागेल.
या पोस्टमध्ये कंगनाने लिहिले, ‘दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने चित्रपटगृहांना प्रोत्साहन दिल्याचे ऐकून आनंद झाला. हिंदी पट्टय़ातही छोटी पावले उचलली जात आहेत. अलीकडील एक महिला केंद्रीत चित्रपटात एक मोठा नायक आणि एक सुपरस्टार दिग्दर्शक आहे. ही त्यांची छोटी पावले असतील, पण ती क्षुल्लक नाहीत. सध्या व्हेंटिलेटरवर असलेल्या चित्रपटगृहांसाठी हे पाऊल संजीवनी ठरणारे आहे. चित्रपट माफिया काहीतरी चांगले करतील, अशी मला कधीच अपेक्षा नव्हती.’’ पहिल्याच दिवशी गंगूबाईने कोटींचा गल्ला जमवला असला तरी गेल्या काही दिवसांपासून टिकास्त्र सोडणाऱया कंगनाकडून मिळालेली ही पावती आलियासाठी लाखमोलाची आहे. यावर आलियाने म्हटलय की, मला कुणालाही कृतीतून उत्तर द्यायला आवडते आणि मी ते दिलेय.
संकलन – अनुराधा कदम