वार्ताहर / कुंभोज
कुंभोज तालुका हातकणंगले येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे ग्रामपंचायत कुंभोज यांच्या माध्यमातून शासनाचा मंजूर झालेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. परिणामी सदर प्रकल्पाला गावात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोध झाला, त्यामुळे सदर प्रकल्प आरोग्य केंद्र इमारतीच्या शासकीय जागेत उभा करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
याला सुरुवात ही झाली परंतु सध्या छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील नागरिकांनी सदर कामाला मोठ्या प्रमाणात विरोध केला असून सदर बांधकाम बंद पाडले आहे. त्याच पद्धतीने सदर प्रकल्पाला छत्रपती शिवाजी महाराज नगरातून आम्ही विरोध करत असून आरोग्य केंद्राच्या इमारती नजीक सदर प्रकल्प नसावा ग्रामपंचायतीने सदर प्रकल्पासाठी त्यांच्या अनेक ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या शासकीय जागांचा वापर करावा किंवा दानोळी रोड नजीक ग्रामपंचायतीच्या मालकीच्या असणाऱ्या खाणींचा वापर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी करावा अशी मागणी कुमार भोरे,आब्बास डोणे,व छत्रपती शिवाजी महाराज नगरातील नागरिकांच्यातून जोर धरत आहे.
परिणामी सदर परिसरातील महिला व नागरिकांनी काल एकत्र येऊन चालू असलेली प्रकल्पाचे बांधकाम बंद पाडले व इथून पुढे बांधकाम चालू करू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली, यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच दावीत घाडगे ,ग्रामपंचायत सदस्य अनिकेत चौगुले, आप्पासाहेब पाटील, सदाशिव महापुरे ,संभाजी मिसाळ, अजीत देवमोरे अमरजीत बंडगर ,ग्रामविकास अधिकारी विलास फोलाने यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील नागरिकांना सदर प्रकल्पाचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला परिणामी परिसरातील नागरिकांची कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प उभा करून देणार नाही. ही एकच भूमिका शेवटपर्यंत ठाम राहिली त्यामुळे काही काळ परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.
कोल्हापूर जिल्ह्यात सदर प्रकल्प फक्त कुंभोज येथेच मंजूर झाला असून अनेक ठिकाणी होत असलेल्या विरोधामुळे सदर प्रकल्प आता ग्रामपंचायत कोणत्या ठिकाणी उभा करणार, कशा पद्धतीचे नियोजन करणार याकडे कुंभोज ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे.