ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेना नेते आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पाठोपाठ आता सोमय्या यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना लक्ष्य केले आहे. चहल यांच्या काळातच मुंबई महानगरपालिकेत सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे. ते पदावर असल्यावर निष्पक्ष चौकशी होणार नाही. त्यामुळे त्यांची आयुक्तपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले, प्राप्तीकर विभागाचे अधिकारी गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी ठाण मांडून आहेत. यशवंत जाधव हे मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचे फंड कलेक्टर होते. मी गेल्या चार ते सहा महिन्यांपासून त्यांच्या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करत आहे.त्यांच्याकडे तब्बल 100 कोटी रूपयांपेक्षा अधिकची संपत्ती असल्याचा अंदाज आहे.
सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यानंतर आता विमल अग्रवाल यांचे नाव उघड केले आहे. विमल अग्रवाल याला मातोश्री आणि यशवंत जाधव यांच्या घरी थेट प्रवेश होता. याच विमल अग्रवाल याच्यावर मुंबई पोलिसांना निकृष्ट दर्जाची बुलेटप्रुफ जॅकेट पुरवल्याचा आरोप आहे. लवकरच हे प्रकरण बाहेर येईल, असेही सोमय्या म्हणाले.