स्थानिकांसह देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी
प्रतिनिधी/ पणजी
गोवा पर्यटन खात्यातर्फे आयोजित कार्निव्हलला शनिवार 26 फेब्रुवारीपासून पणजी राजधानीत धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. किंग मोमो याने सर्वांना ‘खा प्या, मजा करा तसेच आनंदी रहा’, असा संदेश देत कार्निव्हलला प्रारंभ केला. आता गोव्यातील अन्य प्रमुख शहरातही या कार्निव्हलची धूम पाहायला मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे कार्निव्हल मिरवणूक झाली नव्हती दोन वर्षानंतर कार्निव्हल होत असल्याने स्थानिक तसेच देशी-विदेशी पर्यटकांनी मोठय़ाप्रमाणात गर्दी केली होती.
जुन्या सचिवालय इमारतीपासून ते मिरामारपर्यंत कार्निव्हलची मिरवणूक आयोजित केली होती. उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय, पोलीस महासंचालक शुक्ला, पणजी मनपा आयुक्त आग्नेलो फर्नांडिस, पर्यटन खात्याचे संचालक मिनीन डिसोझा, उपसंचालक राजेश काळे व इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी मोठय़ाप्रमाणात देशी-विदेशी पर्यटकांनी कार्निव्हलला उपस्थिती लावली होती.
गोव्यातील पारंपरिक व्यवसायांचे दर्शन
सुमारे 40 हून अधिक चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. गोव्यातील पारंपरिक व्यवसायांचे तसेच गोव्याची संस्कृती दर्शविणारे चित्ररथ होते. निसर्ग वाचवा पाणी वाचवा, मद्यपान करून वाहने चालवू नका, वाहतुकीचे नियम पाळा, झाडे वाचवा गोवा सांभाळा, गोव्याची शान म्हणजे निसर्ग त्याचे जतन करणे काळाची गरज आदी संदेश देणारेही चित्ररथ मिरवणुकीत होते. यावर्षी प्रथमच पोलीस खात्याचा पिंक फोर्स व पोलीस कमांडो यांचा चित्ररथ कार्निव्हल मिरवणुकीत सहभागी झाला होता. या सर्व चित्ररथांमध्ये सर्वांचे लक्षवेधून घेणारा चित्ररथ ठरला तो ओल्ड गोवा येथील सनशाईन हायस्कूलचा. मुलांना केवळ पुस्तकी ज्ञानातच व्यस्त न ठेवता त्यांच्या अन्य कलागुणांनाही वाव देऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने मुलांचे जडण-घडण व्हावे अशास्वरूपाचा संदेश देणारा हा चित्ररथ होता. वेशभूषा स्पर्धेमध्ये अनेक कलाकारांनी भाग घेतला होता. मिरवणुकी दरम्यान अनेक कलाकारांनी नृत्याचा आविष्कार घडवीत उपस्थितांचे मनोरंजन केले.









