भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजची घोषणा
ख्राईस्टचर्च / वृत्तसंस्था
आगामी महिला वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी हरमनप्रीत कौर भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार असेल, अशी घोषणा कर्णधार मिताली राज हिने शनिवारी केली. अलीकडेच न्यूझीलंडविरुद्ध संपन्न झालेल्या वनडे मालिकेत ही जबाबदारी दीप्ती शर्माकडे होती. हरमनप्रीत चौथ्या वनडेत खेळू शकली नाही. पाचव्या वनडेत ती खेळली. मात्र, त्यावेळीही दीप्तीकडेच ही जबाबदारी कायम ठेवण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर मिताली बोलत होती.
महिला गटातील आगामी विश्वचषक स्पर्धा दि. 4 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत न्यूझीलंडमध्ये खेळवली जाणार आहे. भारतीय संघ आपल्या मोहिमेला दि. 6 मार्च रोजी पाकिस्तानविरुद्ध लढतीने सुरुवात करणार आहे.
‘न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेतील शेवटच्या दोन वनडे लढतीत दीप्तीकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय निवड समिती आणि बीसीसीआयचा होता. आता विश्वचषक स्पर्धेत हरमनप्रीत संघाची उपकर्णधार असेल’, असे मिताली शनिवारी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हणाली.
‘विश्वचषकाच्या सर्वोच्च व्यासपीठावर खेळण्याचा आनंद लुटत राहा, इतका सल्ला मी संघातील नवोदित खेळाडूंना प्राधान्याने देईन. कारण, दडपण घेत राहिले तर त्यांना त्यांचा नैसर्गिक खेळ साकारता येणार नाही आणि असे झाल्यास विश्वचषकात अपेक्षित कामगिरी साध्य करता येणार नाही’, याचा मितालीने पुढे उल्लेख केला.
‘फलंदाजी लाईनअपने एकजिनसी खेळ साकारण्यात यश संपादन केले आहे. गोलंदाजी आघाडीने काही वेळ घेतला. भारतात कोरोनाचे रुग्ण वाढत राहिल्याने आम्हाला प्रशिक्षण शिबिर आयोजित करता आले नाही. त्यामुळे, न्यूझीलंडविरुद्धची मालिका आमच्यासाठी सरावाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची होती’, असेही ती म्हणाली. भारताला न्यूझीलंडविरुद्ध सदर मालिकेत 1-4 अशा एकतर्फी फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता.
शफाली, रिचाकडून भरीव अपेक्षा
मागील वर्षी आम्ही संघात बरेच नवनवे प्रयोग राबवले आणि त्यातून काही उत्तम खेळाडूंची लाईनअप उभी करता आली. रिचा घोष, शफाली वर्मा, मेघना सिंग, पूजा वस्त्रकार असे अव्वल खेळाडू याचमुळे वर्ल्डकप गाजवण्यासाठी सज्ज आहेत, असे निरीक्षण मितालीने यावेळी नोंदवले. वर्ल्डकपसारख्या मोठय़ा स्पर्धांमध्ये ज्याप्रमाणे केवळ अनुभवी खेळाडूंवर अवलंबून राहून चालत नाही, त्याचप्रमाणे केवळ नवोदितांवर अवलंबूनही चालत नाही. अनुभवी व नवोदित यांचा उत्तम मिलाफ आवश्यक ठरतो, याचा तिने येथे उल्लेख केला.
बॉक्स
महिला वनडे विश्वचषक स्पर्धेतील भारताचे सामने
तारीख / प्रतिस्पर्धी / भारतीय प्रमाणवेळ / ठिकाण
6 मार्च / पाकिस्तान / सकाळी 6.30 वा. /माऊंट माऊंगनुई
10 मार्च / न्यूझीलंड / सकाळी 6.30 वा. / हॅमिल्टन
12 मार्च / विंडीज / सकाळी 6.30 वा. / हॅमिल्टन
16 मार्च / इंग्लंड / सकाळी 6.30 वा. / माऊंट माऊंगनुई
19 मार्च / ऑस्ट्रेलिया / सकाळी 6.30 वा. / ऑकलंड
22 मार्च / बांगलादेश / सकाळी 6.30 वा. / हॅमिल्टन
28 मार्च / द. आफ्रिका / सकाळी 6.30 वा. / ख्राईस्टचर्च
न्यूझीलंडची लॉरेन डाऊन वर्ल्डकपमधून बाहेर
ख्राईस्टचर्च ः किवीज महिला संघातील फलंदाज लॉरेन डाऊन दुखापतीमुळे आगामी आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. भारताविरुद्ध पाचव्या वनडे लढतीत झेल घेण्याच्या प्रयत्नात तिच्या उजव्या अंगठय़ाला दुखापत झाली. वैद्यकीय चाचणी केल्यानंतर तिला प्रॅक्चर झाल्याचे आढळून आले. लॉरेनच्या जागी जॉर्जिया प्लिमरला पाचारण केले गेले असून मॉली पेनफोल्डला देखील ट्रव्हेलिंग रिझर्व्ह प्लेयर या नात्याने संघात समाविष्ट केले गेले आहे.
‘वर्ल्डकप मोहिमेसाठी लॉरेन ही आमची अतिशय महत्त्वाची सदस्य होती. आगामी स्पर्धेत तिची गैरहजेरी आम्हाला प्रकर्षाने जाणवेल, यात शंका नाही. मध्यफळीत उपयुक्त फलंदाजी आणि कुशल क्षेत्ररक्षण या आघाडय़ांवर तिने आमच्या संघासाठी लक्षवेधी योगदान दिले. हीच अपेक्षा तिच्याकडून विश्वचषकातही होती’, असे किवीज महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक बॉब कार्टर यांनी नमूद केले.
फोटो कॅप्शन ख्राईस्टचर्च येथील छोटेखानी सोहळय़ात विश्वचषकासह ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग, पाकिस्तानची बिस्माह मरुफ, विंडीजची स्टेफानी टेलर, इंग्लंडची हिदर नाईट, न्यूझीलंडची सोफी डीव्हाईन, भारताची मिताली राज, द. आफ्रिकेची सूने लूस व बांगलादेशची निगर सुल्ताना









