जगभरातील बाजारात तेजी परतली : निफ्टी निर्देशांक वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील सात दिवसांच्या घसरणीला अखेर चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी पूर्णविराम मिळाल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये दोन्ही निर्देशांकात म्हणजे बीएसई सेन्सेक्स व एनएसईमधील निफ्टी 2.5 टक्क्यांनी वाढून बंद झाला आहे.
युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर अमेरिका तसेच अन्य सहयोगी देशांकडून लागू करण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधामुळे जागतिक बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. याचा सकारात्मक प्रभाव म्हणून देशातील बाजारात तेजी पुन्हा परतली आहे. या अगोदरच्या दिवशी गुरुवारी भारतीय बाजारात एकाच दिवसात मागील दोन वर्षातील सर्वात मोठी घसरण नोंदवली होती.
बीएसई सेन्सेक्स 1,328.61 अंकांनी वधारुन निर्देशांक 2.44 टक्क्यांसोबत 55,858.52 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 410.45 अंकांनी मजबूत होत 16,658.40 वर बंद झाला आहे. या सर्व घडामोडींमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले वगळता सेन्सेक्समधील सर्व समभाग तेजीसह बंद झाले आहेत. यामध्ये टाटा स्टील, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, एनटीपीसी आणि टेक महिंद्राचे समभाग तर 6.54 टक्क्यांनी वधारले आहेत.
दुसऱया बाजूला अमेरिका, युरोपीयन संघ आणि जपान यांनी युक्रेनला मदत करण्याचा संकल्प केला असून सोबत रशियावर आर्थिक तसेच अन्य स्वरुपातील आर्थिक निर्बंध लावण्यासाठी एकमत झाले आहे.
सकारात्मक घडामोडींचा प्रभाव
शेअर बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार युपेन संकटाच्या दरम्यान विदेशी संस्थांत्म गुंतवणूकदारांनी 6,448.24 कोटी रुपये मूल्याच्या समभागाची विक्री केली आहे. रशियावर निर्बंध लागू करण्याच्या घोषणेनंतर अमेरिकन शेअर बाजारात तेजीचा माहोल परतला असून याचा सकारात्मक परिणाम म्हणून आशियातील विविध प्रमुख शेअर बाजार तेजीसह मजबूत होत बंद झाले आहेत.









