महाविकास आघाडी सरकारकडून साखर कारखानदारांची पाठराखण एकरकमी एफआरपी, दिल्याशिवाय नव्या हंगामाचे धुराडे पेटू देणार नाही, सदाभाऊ खोत यांचा इशारा
प्रतिनिधी / कोल्हापूर
एफआरपीचे दोन तुकडे करण्याच्या महाविकास सरकारच्या निर्णयाविरोधात आमदार सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. साखर कारखानदारांची पाठराखण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱयांचे टनाला 700 रूपयांचे नुकसान होणार आहे, असा गंभीर आरोप करत एकरकमी एफआरपी दिल्याशिवाय पुढील हंगामाची ध़ुराडी पेटवू देणार नाही, असा इशारा खोत यांनी दिला. 1 मार्च पासून शासन आदेशाची होळी राज्यभर केली जाणार असून त्यानंतर जनजागृती मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सदाभाऊ खोत गुरूवारी कोल्हापूर दौऱयावर आले होते. त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भारतीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, उपाध्यक्ष दादा देसाई, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष एन. डी. चौगुले, श्रीकांत घाटगे, नाशिकचे दीपक पगार आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, एफआरपीचे दोन तुकडे करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारचा एफआरपीचा कायदा पायदळी तुडवला आहे. साखर कारखानदारांची पाठराखण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱयांना पुढचे हप्ते मिळत नाहीत असा आजवरचा अनुभव आहे. काही निवडक कारखाने वगळता इतर कारखाने एफआरपीची पूर्ण रक्कम देऊ शकणार नाहीत, हे माहिती असताना महाविकास आघाडी सरकारने एफआरपीचे तुकडे केले आहेत. त्यामुळे शेतकऱयांचे टनाला 700 रूपयांचे नुकसान होणार आहे. केंद्र सरकारने एफआरपीच्या कायद्यानुसारच राज्य सरकारांना एकरकमी एफआरपी देण्याचे आदेश दिले आहेत. या कायद्यात कोणताही बदल केलेला नाही. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कायदा पायदळी तुडविला आहे.
राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभर जनजागृती केली जाणार आहे. 1 मार्च रोजी राज्यभर शासन आदेशाची होळी केली जाईल. त्यानंतर राज्यभरात जनजागृती मोहीम सुरू करण्यात येईल. रयत क्रांती मोर्चा आणि भारतीय किसान मोर्चा यांच्या वतीने संयुक्तरित्या शासन निर्णयाला विरोध केला जाईल. एप्रिलमध्ये कोल्हापूरमध्ये ऊस उत्पादक शेतकऱयांच्या मेळाव्याचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात घोटाळे, घोटाळे
सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मेळ आरोप केला. ते म्हणाले, सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नसल्याचे दररोज नवीन घोटाळा उघडकीस येत आहे. परीक्षेत घोटाळा, आदिवासीच्या मुलांच्या परीक्षेतही घोटाळा, जमीन घोटाळा, या घोटाळय़ाच्या चौकशीत सरकार चालढकल करत आहे. राज्य विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पिय अधिवेशनात घोटाळय़ाविरोधात आवाज उठविणार असल्याचेही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
गोविंद बागेसमोर आंदोलन करणार काय? ,राजू शेट्टींवर निशाणा
सदाभाऊ खोत यांनी या पत्रकार परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांचे नाव न घेता आपल्या खास शैलीत त्यांच्यावर निशाणा साधला. सदाभाऊ म्हणाले, काही शेतकरी नेते नाचत होते, तेच आता महाविकास आघाडी सरकारमध्ये आहेत. सरकारमध्ये असताना कामे करून घेण्याऐवजी ते आंदोलने करत आहेत. मग ते पंढरपूर ते बारामती यात्रा काढणार काय ?, शरद पवारांच्या बारामतीतील गोविंद बागेसमोर आंदोलन करणार काय? असा प्रश्न शेतकऱयांना पडला आहे. त्यांचे अश्रू मगरीचे अश्रू आहेत, अशा शब्दात सदाभाऊंनी शेट्टी यांना टोला लगावला.








