म. ए. समितीची परिवहन मंडळाकडे मागणी : शहर तसेच ग्रामीण भागात बसफेऱया वाढवा
प्रतिनिधी /बेळगाव
भाषिक अल्पसंख्याक आयोगाने मराठी भाषिकांना त्यांचे भाषिक अधिकार दिले असतानाही कर्नाटकात त्यांची पायमल्ली होते. परिवहन मंडळाच्या बसेसवर केवळ कन्नड भाषेतील बोर्ड असल्यामुळे मराठी भाषिकांना प्रवास करताना अनेक अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी परिवहन मंडळाने भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या निर्णयानुसार बसेसवर कन्नडसह मराठी फलक लावावेत, अशी मागणी म. ए. समितीने परिवहन मंडळाच्या विभागीय नियंत्रकांकडे केली आहे.
15 टक्क्मयांहून अधिक भाषिक अल्पसंख्याक असल्यास त्यांना त्यांच्या भाषेत परिपत्रके देणे हा सरकारी नियम आहे. बेळगाव जिल्हय़ात मराठी भाषिक 21 टक्के असून, त्यांना मराठीत परिपत्रके देणे हा त्यांचा अधिकार आहे. ग्रामीण भागात मोठय़ा संख्येने मराठी भाषिक राहतात. परंतु परिवहन मंडळाच्या बसेसवर मराठीला स्थान नसल्याने बस येऊन गेली तरी त्याची माहिती प्रवाशांना होत नाही. याचा फटका परिवहनच्या महसुलालाही बसत आहे. त्यामुळे परिवहन मंडळाने कन्नडसह मराठीला स्थान दिल्यास प्रवाशांच्या सोयीसह परिवहनलाही महसूल मिळेल, असे मत विभागीय नियंत्रकांच्या समोर मांडण्यात आले. विभागीय नियंत्रक पी. वाय. नाईक यांनी आपण परिवहनच्या हुबळी येथील कार्यालयाशी यासंदर्भात चर्चा करू, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल
कोरोनाच्या लाटेनंतर बस फेऱयांची संख्या कमी करण्यात आली होती. परंतु सध्या परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने बसफेऱयाही वाढविणे आवश्यक आहे. शहर तसेच ग्रामीण भागात बस उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना लोंबकळत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. शहरी भागात उपनगरांमध्ये जाण्यासाठी बस उपलब्ध केल्यास परिवहनलाही महसूल मिळेल, त्यामुळे बसफेऱयांची संख्या वाढवावी, अशी मागणी अधिकारी वर्गाकडे करण्यात आली.
अन्यथा भव्य मोर्चा
जिल्हाधिकारऱयांची भेट घेऊन प्रत्येक विभागाने मराठी भाषिकांना भाषिक अधिकार द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु अद्याप याबाबत कोणतीही ठोस भूमिका जिल्हाधिकाऱयांनी घेतलेली नाही. येत्या काही दिवसांत पुन्हा त्यांची भेट घेतली जाणार आहे. भाषिक अधिकार डावलण्याचा प्रयत्न झाल्यास पुढील काळात म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढला जाईल, असा इशारा पदाधिकाऱयांनी दिला. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर व इतर उपस्थित होते.









