साईराज चषक निमंत्रितांची क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक निमंत्रितांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात सिव्हिल इलेव्हन संघाने वॉटरसप्लाय संघाचा 39 धावानी, फार्मा इलेव्हनने पोलीस विभागाचा 7 गडय़ांनी, साईराज संयोजक संघाने बेळगाव पोस्ट संघाचा, क्रीडाई संघाने महानगरपालिका संघाचा 8 गडय़ानी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. सागर गौरगोंडा, सुनील पाटील आदिनाथ गावडे, गजानन फगरे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर साईराज चषक निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात सिव्हिल इलेव्हनने 10 षटकात 3 बाद 95 धावा केल्या. विनयने 3 चौकारासह 27, कपिलने 4 चौकारासह 25, तर मिलिंद बेळगावकरने 3 चौकारासह 22 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना वॉटरसप्लाय संघाचा डाव 8.5 षटकात 56 धावात आटोपला. त्यात लक्ष्मणने 3 चौकारासह 15 धावा केल्या. दुसऱया सामन्यात पोलीस विभागाने 10 षटकात 7 बाद 53 धावा केल्या. त्यात संतोषने 13 धावा केल्या. फार्मातर्फे सुनीलने 13 धावात 3 तर संदीपने 12 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना फार्मा संघाने 6 षटकात 3 बाद 54 धावा करून सामना 7 गडय़ानी जिंकला. विजयने 1 षटकार, 1 चौकारासह 23 धावा केल्या.
तिसऱया सामन्यात साईराज संयोजक संघाने 10 षटकात 7 बाद 81 धावा केल्या. आदिनाथ गावडेने 1 षटकार, 5 चौकारासह 34 धावा करून अर्धशतक झळकाविले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव पोस्ट संघाने 10 षटकात 8 बाद 73 धावा करून सामना 7 धावांनी जिंकला. चौथ्या सामन्यात क्रीडाई संघाने 10 षटकात 8 बाद 61 धावा केल्या. संदीपने 19 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना महानगरपालिका संघाने 10 षटकात 7 बाद 53 धावाच केल्या. क्रीडाईतर्फे गजानन फगरेने 6 धावात 3 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे भाऊ फगरे, श्रीकांत फगरे व रोहित फगरे यांच्या हस्ते सागर गौरगोंडाला चषक देण्यात आला. तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे मयूर हिरेमठ, विजय भंडारी यांच्या हस्ते आदिनाथ गावडेला चषक देण्यात आला.
आजचे उपांत्य सामने : 1) क्रीडाई इलेव्हन वि. फार्मा, स.10 वा., 2) साईराज संयोजक वि. सिव्हिल इलेव्हन, दु. 12. वा.
अंतिम सामना- दुपारी 2 वाजता.









