राजापूर
तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत राज्याचे पर्यावरणमंत्री नामदार आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग दौऱयाप्रसंगी सूचक वक्तव्य केल्यानंतर रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. राजापूर तालुका व कोकणच्या औद्योगिक विकासासाठी आग्रही असलेल्या ओम चैतन्य ट्रस्ट तसेच अखिल भारतीय भंडारी महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱयांनी मंगळवारी रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने उद्योगमंत्री नामदार सुभाष देसाई यांची भेट घेतली. यावेळी देसाई यांनी लवकरच केंद्रीय पथक जागा पाहणीसाठी राजापुरात येईल. त्यानंतर आपण दौरा करू, अशी माहिती दिल्याचे महासंघाच्या पदाधिकाऱयांनी सांगितले. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प राजापुरातच होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत मागील काही दिवसांमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत. रिफायनरी प्रकल्पासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाला ना हरकत दिल्याचे वृत्त ताजे असतानाच आदित्य ठाकरे यांनी मालवणच्या दौऱयात रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मकतेने विचार केला जात असल्याचे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर ओम चैतन्य ट्रस्ट व अखिल भारतीय भंडारी महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱयांनी मंगळवारी सुभाष देसाई यांची शिवनेरी या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी ओम चैतन्य ट्रस्टच्या डॉ. महेंद्र कदम यांनी स्थानिक पातळीवर प्रकल्पाविषयी गैरसमज पसरवून एनजीओ करीत असलेल्या कारवायांची माहिती देत राज्य शासनाने गुप्तचर यंत्रणेमार्फत याची चौकशी करावी, अशी मागणी केली. या शिष्टमंडळात सहभागी अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी कोकणातील पायाभूत विकासाच्या दृष्टीने भंडारी समाजाने प्रकल्पाला समर्थन देत जागृती हाती घेतल्याची माहिती दिली.
ओबीसी संघटनेचे राजापूर तालुकाध्यक्ष महेश शिवलकर यांनी राजापूर तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱया 55 संघटनांसह सुमारे 125 गावांनी प्रकल्प समर्थनार्थ पत्रे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सादर केल्याचे सांगितले. राजापूर नगर परिषदेनेही प्रकल्प समर्थनाचा ठराव केला असून बारसू-गोवळ-धोपेश्वरमध्ये प्रकल्प येण्यासाठी तालुका एकवटला असल्याचे सांगितले. प्रकल्पाच्या अनुषंगाने रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तत्काळ प्रशिक्षण केंद्रे उभारण्याची मागणी यावेळी भंडारी महासंघाचे अध्यक्ष बांदिवडेकर यांनी केली. पावस येथील तरूण आशिष कीर यांनी राजापूर तालुक्यात केलेल्या जागृती मोहिमेची माहिती दिली.
यावेळी राजापूर-धोपेश्वर येथील तरूण मंदार रानडे, सीए विश्राम परब, डॉ. महेंद्र कदम यांनी प्रकल्पाबाबत राज्य शासनाकडून अपेक्षित धोरणांविषयी चर्चा केली.
लवकरच केंद्रीय पथक जागा पाहणीसाठी राजापुरात येणार
यावेळी नामदार देसाई यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीत बारसू-गोवळ-धोपेश्वरमध्ये प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत रत्नागिरी रिफायनरी कंपनीचे सीईओ बी. अशोक तसेच उद्योग विभाग व राज्य शासनाच्या सचिव पातळीवर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. राज्य शासनाच्या सचिव स्तरावरील अधिकाऱयांनी पेट्रोलियम मंत्रालयात प्रकल्पाच्या अनुषंगाने नवी दिल्लीत जाऊन चर्चा केली आहे. लवकरच केंद्रीय पथक जागा पाहणीसाठी राजापुरात येईल, त्यानंतर आपण दौरा करू, अशी माहिती दिली.
आदित्य ठाकरे यांची भूमिका सर्वंकष विचाराअंती
यावेळी शिष्टमंडळातील पदाधिकाऱयांनी स्थानिक पातळीवर शिवसेनेचीच काही मंडळी प्रकल्पाबाबत एनजीओंच्या जोडीने स्थानिक ग्रामस्थांत गैरसमज पसरवत असल्याची माहिती दिली. यावेळी देसाई यांनी आपणही शिवसेनेचे एक वरिष्ठ नेते असून अदित्य ठाकरे यांनी सर्वंकष विचार करूनच प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचा पुनरूच्चार केला. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना यापेक्षा वेगळे संकेत कशासाठी हवेत, असा सवाल करून त्यांनी एमआयडीसीची अधिसूचना आधीच जारी असल्याकडे लक्ष वेधले.
प्रकल्पाची व्याप्ती कमी होणार?
राजापूरमध्ये होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प पूर्वी 60 मिलियन मेट्रिक टन क्षमतेचा होता. मात्र प्रदीर्घकाळ झालेल्या विरोधामुळे प्रकल्पाची व्याप्ती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आता बारसू-गोवळ-धोपेश्वरमध्ये 20 मिलियन मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प होऊ शकतो, अशी चर्चा आहे.