युक्रेन संघर्ष चिघळण्याची चिन्हे, भारताचे शांततेचे आवाहन
@ किएव्ह / वृत्तसंस्था
स्वतंत्र देश म्हणून घोषित केलेल्या युक्रेनच्या दोन प्रांतांमध्ये रशियाने सैन्य धाडल्यानंतर आता अनेक युरोपियन देशांनी अमेरिकेच्या समवेत रशियाविरोधात आघाडी उघडली आहे. अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध लादले असून काही बँकांवर कारवाई केली आहे. फ्रान्स आणि ब्रिटननेही रशियाला गंभीर परिणामांचा इशारा दिला असून जर्मनीने रशियाकडून नैसर्गिक वायू घेण्यासाठी प्रारंभ केलेल्या प्रकल्पाचे काम बंद करण्याचा आदेश दिला. मात्र, रशियाने आर्थिक निर्बंधांचा आपल्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे प्रत्युत्तर दिले आहे.
युपेन हा स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहे, हे रशियाला मान्य नाही, असा आरोप फ्रान्सने केला. जर्मनीनेही त्याला दुजोरा दिला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांच्या भाषणात युक्रेन हा स्वतंत्र देश असल्याचे नाकारले होते. गेल्या तीन दिवसांमधील घडामोडी पाहता रशियाने युक्रेनमध्ये आक्रमण पेले आहे असाच निष्कर्ष काढावा लागतो,
तैवानला चिंता
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास त्याचा लाभ चीन घेईल. चीनही तैवानवर दावा करीत आहे. तो तैवानमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल, अशी चिंता तैवानचे अध्यक्ष त्साइंग वेन यांनी व्यक्त केली. रशियाची युक्रेनमधील घुसखोरी चीन तैवानमध्ये घुसखोरी करण्याचे निमित्त म्हणून उपयोगात आणेल. तसे झाल्यास जागतिक युद्ध होण्याची शक्यता आहे, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले.
तुलना करु नका
युपेनमधील परिस्थिती आणि तैवान यांची तुलना करु नका, असे आवाहन चीनने केले आहे. चीन काय करणार हे चीनच्या आसपासच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. त्याचा जगातील इतर भागांमधील स्थितीशी संबंध नाही, असे चीनने स्पष्ट केले असले तरी त्यावर विश्वसमुदाय विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे युक्रेनचे संरक्षण करतानाच अमेरिकेला तैवानच्या आघाडीचे उत्तरदायित्व सांभाळण्याचीही योजना आखावी लागेल, असेही मतप्रदर्शन होत आहे.
30 दिवसांची आणीबाणी
रशियाकडून हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन युपेनने देशात 30 दिवसांची आणीबाणी घोषित केली आहे. अद्याप निर्णयाला तेथील संसदेची मान्यता मिळालेली नाही. मात्र ती लवकरच मिळेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे लोकांच्या सर्व अधिकारांवर तात्पुरती बंधने घालण्यात आली आहेत. रशियातून बाहेर पडा असा आदेशही युक्रेनने आपल्या रशियातील नागरीकांना दिला आहे.
मॅक्रॉन-पुतीन चर्चा
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी मंगळवारी रात्री टेलिफोनवरुन प्रदीर्घ चर्चा केली. ही चर्चा युक्रेनमधील तणाव निवळण्यासंबंधी होती, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र, यासंबंधीची सविस्तर माहिती देण्यात आली नाही. फ्रान्सच्या अध्यक्षांनी रशियाला तणाव कमी करण्याचा सल्ला दिला, असेही बोलले जात आहे. याचा परिणाम लवकरच दिसणे शक्य आहे.
बॉक्स
भारताचे शांततेचे आवाहन
युपेन संघर्षाशी संबंधित असणाऱया सर्व देशांनी शांतता निर्माण करण्यावर भर द्यावा. कोणतेही युद्ध जगाला संकटात टाकू शकते. याचा विचार केला जावा. संबंधित देशांनी एकमेकांशी संवाद साधावा आणि युद्धाचे ढग दूर करावेत. आम्ही शांतता आणि सौहार्द यांच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. युद्ध होणार नाही, अशी आशा आम्हाला वाटते, असे प्रतिपादन विदेश राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी केले.
बॉक्स
संघर्षासाठी अमेरिका जबाबदार
युक्रेनचा उपयोग अमेरिका रशियाचे महत्व कमी करण्यासाठी करुन घेत आहे. रशियाला इतर पश्चिम युरोपियन देशांना इंधन आणि नैसर्गिक वायू पुरविता येऊ नये अशी अमेरिकेची इच्छा आहे. हे इंधन पुरविणारी रशियाची पाईपलाईन युक्रेनमधून जाते. परिणामी या संघर्षाला अमेरिकाच जबाबदार आहे, असे प्रतिपादन रशियाने केले. चीननेही अमेरिका भीती निर्माण करत असल्याचा आरोप केला.
बॉक्स
भारताच्या तटस्थतेचे समर्थन
युपेन संघर्षात भारताने अमेरिका किंवा रशिया या दोन्ही देशांपैकी एकाची उघड बाजू घेण्यास नकार दिला आहे. भारताचे या दोन्ही देशांशी सलोख्याचे संबंध असून व्यापार आणि संरक्षण क्षेत्रात भागीदारीही आहे. त्यामुळे या वादात पडण्याचे भारताने टाळले आहे. भारताची ही भूमिका योग्य असल्याचे मतप्रदर्शन रशियाच्या भारतातील राजदूतांनी केले असून भारताला मध्ये ओढू नका असे आवाहन केले.
बॉक्स
सूत्रधार भारतीय वंशाचा
अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांना रशियाविरोधात करावयाच्या उपायांसंबंधी सल्ला देणाऱया गटाचे नेतृत्व भारतीय वंशाचे तज्ञ दलीप सिंग हे करीत आहेत. याच गटाने रशियावर आर्थिक निर्बंध लादण्याचा सल्ला दिला होता. तो अध्यक्ष बायडन यांनी त्वरित लागू केला आहे. यापुढची कारवाई काय करायची ते ठरविण्यासाठी या गटाची लवकरच बैठक होणार आहे.