चित्रनगरीत नवनवीन मालिका, चित्रपट आणण्यासाठी चित्रपट महामंडळाच्या प्रयत्नावर प्रश्नचिन्ह
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर ही मराठी चित्रपटसृष्टीची पंढरी.. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी उभारलेल्या जयप्रभा स्टुडिओमध्ये शेकडो मराठी, हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण झाले. आता या स्टुडीओच्या संवर्धनासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासह सर्वच कलाकार संघटनांनी घेतलेली आंदोलनाची भुमिका स्वागतार्ह आहे. परंतु कलाकारांना रोजगार मिळावा, महामंडळाचे मुख्य कार्यालय कोल्हापुरातच रहावे, यासाठी कलाकार एकत्र येत असल्याचे चित्र फारसे दिसत नाही. परिणामी एरव्ही ही एकी जाते कोठे, असा प्रश्न सर्वसामान्य कोल्हापूरकरांतून केला जात आहे.
मराठी चित्रपट, मालिका कोल्हापुरात आणून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी चित्रपट महामंडळासह स्थानिक लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत. परंतु राजकारण्यांना लाजवेल अशा कुरघोडीच्या राजकारणामुळे एखाद्या भूमिकेवेळी रंगवलेल्या चेहऱ्यामागील मूळ चेहरे हळूहळू समाजासमोर आले. महामंडळांतील अंतर्गत राजकारणामुळे कोल्हापुरात चित्रिकरणासाठी निर्माते येण्यास तयार नसल्याची चर्चा आहे.
सद्यस्थितीत चार मालिका सोडल्या तर कोल्हापुरात चित्रपट येत नाहीत. एखादी मालिका आली तरी स्थानिकांकडून निर्मात्यांबरोबर अर्थकारणासाठी वाद घातला जात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभुमीवर महामंडळाने अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत शासनाच्या मदतीने चित्रिकरणासाठीचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्यावे, अशी भुमिका पुढे येत आहे. मतभेद असू शकतात परंतु मनभेद झाले तर राजकारणामुळे ते वैयक्तिक पातळीवर पोहोचतात, याची प्रचिती महामंडळाच्या निवडणुकीवेळी, वार्षिक सभेत येतेच. महामंडळाच्या वार्षिक सभेतील वाद पाहून हेच का पडद्यावरील भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे कलाकार? असा प्रश्न पडतो.
पुर्वी चित्रीकरण असलेल्या ठिकाणावरील लोकांच्या घरात जाऊन कलाकार खर्डा-भाकरी खाऊन यायचे. त्यामुळे त्यांच्यात नातेसंबंध निर्माण होत होते. यातून कोल्हापुरात कलाकार आले की हमखास संबंधितांच्या घरी जायचे, जेवायचे. गप्पागोष्टी करायचे. परंतु सध्या वारंवार स्थानिकांकडून होणाऱ्या त्रासामुळे निर्माते, कलाकार जनतेपासून दूर राहत आहेत. प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातील हा दुरावा कमी करण्यासाठी महामंडळाने प्रयत्न केल्यास स्थानिकांना रोजगार मिळेल आणि नवीन पिढी चित्रिकरणासाठी तयार होईल. यातून कोल्हापुरला पुर्वीचे दिवस येतील, अशी अपेक्षा आहे.
कोल्हापूरच्या लोकेशनचा उपयोग करून घ्यावा
जिल्हय़ातील लोकेशन चित्रिकरणासाठी अतिशय उत्कृष्ठ आहेत. त्यामुळेच प्रेम ग्रंथ, ‘सरफरोश’, पद्मावत सारख्या हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण कोल्हापुरात झाले. हिंदी चित्रपट येऊन चित्रीकरण करून जातात, मग मराठी चित्रपटांना काय अडचण आहे. यासाठी महामंडळाने प्रयत्न करावे, अशी अपेक्षा कलाकारातून व्यक्त होत आहे.
कोल्हापुरातील चित्रनगरीत आधुनिक सुविधा
शासनाने कोटय़ावधीच्या अनुदानातून चित्रनगरीची 86 एकर जागा चित्रिकरणासाठी विकसित केली. कोरोना काळात येथे ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ‘मेहंदी है रचनेवाली’ मालिकांचे चित्रीकरण झाले. या मालिकानंतर जवळपास 3 कोटी देऊन हा सेट चित्रनगरीने विकत घेतला आहे. येथे सध्या गजानन महाराज मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. आणखी सहा मालिकांचे चित्रीकरण येथे सुरू होणार आहे. त्यामुळे अंतर्गत वाद बाजूला ठेवून कोल्हापुरात मराठी चित्रपट कसे येतील, यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.