संबंधितांवर कठोर शिक्षा करण्याची मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
केएमटी वाहकास प्रवासी व त्यांच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी बहिरेश्वर येथे घडली. यामुळे केएमटीचे सर्व कर्मचारी अक्रमक झाले आहेत. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, कठोर शिक्षा व्हावी, अशा मागणीचे निवेदन केएमटी कर्मचारी संघटनेच्यावतीने केएमटीचे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक मंगेश गुरव यांना दिले.
केएमटीची कोल्हापूर ते बहिरेश्वर अशी मुक्कामाच्या बस बुधवारी नेहमी प्रमाणे मार्गस्थ झाली होती. वाहक आर.एस. शिर्के आणि चालक एफ. एस. मुजावर डय़ूटीवर होते. बस प्रवासींनी भरल्याने नवीन येणारे प्रवासी दोन्ही दरवाजात आत येत होते. याचवेळी एक महिला बसमध्ये प्रवेश करत असताना वाहक शिर्के यांनी त्यांना बसच्या मागील दरवाज्यातून येण्यास सांगितले. यावरून त्यांच्या दोघांत वाद सुरू झाला. गंगावेश येथील स्टॉपवर संबंधित महिलांनी याबाबत कोणतीही तक्रार केली नाही. शेवटचा स्टॉप आल्यानंतर त्या महिलेन नातेवाईकांना बोलावून घेवून शिर्के यांना बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच सर्व केएमटी कर्मचारी आक्रमक झाले. बुधवारी त्यांनी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक मंगेश गुरव यांची भेट घेतली. संबंधितांवर कठोर शिक्षा करावी. असा प्रकार पुन्हा घडल्यास काम बंद आंदोलन करू, असा इशाराही दिला. यावेळी केएमटी संघटनचे अध्यक्ष प्रमोद पाटील, अमर मोरे, रणजित पाटील, इर्शाद नायकवडी, रवि शिंदे आदी उपस्थित होते.