ऑनलाईन टीम/तरुण भारत
रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव वाढतच आहे. या संघर्षात व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे दोन तुकडे केलेत. दरम्यान, रशिया-युक्रेनच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं तातडीने बैठक बोलावली होती. या बैठकीत भारताने आपली भूमिका स्पष्ट केलीय. भारताने म्हटलं की, युक्रेन आणि त्याच्या आजुबाजुच्या भागात राहणाऱ्या २० हजार भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल. युक्रेनवर ओढावलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने तिथं अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मंगळवारी सकाळी एअर इंडियाचं विशेष विमान युक्रेनमध्ये दाखल झालं. भारताकडून २०० पेक्षा अधिक सीट असलेल्या ड्रीमलायनर बी-७८७ विमान २४२ जणांना घेऊन देशात परतले आहे. युक्रेनहून दिल्लीत परतलेल्या या विद्यार्थ्यांनी तिथल्या तणावपूर्ण परिस्थितीचे अनुभव शेअर केले आहेत.
दरम्यान, एअर इंडियाचं विमान युक्रेन मधील भारतीयांना घेऊन भारतात परतलं आहे. हे विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत असलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याने सांगितले की, “मायदेशी परतून आता निवांत वाटत आहे.” तर, युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी क्रिश राज म्हणाला, “मी युक्रेनमध्ये सीमावर्ती भागापासून लांब राहत होतो त्यामुळे तेथील परिस्थिती सामान्य होती, भारतीय दूतावासाने जारी केलेल्या निवेदनानंतर मी परत आलो.”