हिमाचलमध्ये दुर्घटना : 14 महिला जखमी : 10 महिला 80 टक्क्यांपर्यंत होरपळल्या
वृत्तसंस्था / ऊना
हिमाचल प्रदेशच्या ऊना शहरात मंगळवारी सकाळी एका अवैध फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला आहे. टाहलीवाल औद्योगिक क्षेत्रात ही दुर्घटना घडली असून यात 18 महिलांसह एकूण 20 जण आगीच्या तावडीत सापडले. यातील 6 महिलांचा होरपळून घटनास्थळीच अंत झाला. तर 80 टक्क्यांपर्यंत होरपळलेल्या 10 अन्य महिलांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना चंदीगड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
हिमाचल प्रदेशातील कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत जीव गमाविणाऱयांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय दिलासा निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. मृत तसेच जखमींपैकी काही मजूर उत्तरप्रदेशचे तर काही जण बिहार आणि एक पंजाबमधील आहे.
मागील 7-8 महिन्यांपासून संबंधित कारखान्यात अवैध स्वरुपात फटाके निर्मितीचे काम सुरू होते. यादरम्यान सुरक्षा मापदंडांचे पालन केले जात नव्हते. मंगळवारी दुर्घटनेवेळी 25 हून कामगार तेथे काम करत हेते. अचानक स्फोट झाल्यावर काही कामगार बाहेर पडण्यास यशस्वी ठरले परंतु 20 जण आत अडकून पडले होते. दुर्घटनेतील सर्व जखमी कामगार हे अन्य राज्यांमधून आलेले स्थलांतरित आहेत. जखमींना सध्या प्रत्येकी 5 हजार रुपयांची तातडीची मदत करण्यात आली आहे.









