वृत्तसंस्था / कुवैत सिटी
योगवरून कुवैतमध्ये मुस्लीम महिला कट्टरतावादी मानसिकता असलेल्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. कुवैतमध्ये ओपन एअर फेस्टिव्हल ‘योगा रिट्रीट’च्या आयोजनावर बंदी घालण्याच्या विरोधात महिलांनी संसदेसमोर निदर्शने केली आहेत. येथील योग शिक्षण देणाऱया एका संस्थेने वाळवंटात ‘योगा रिट्रीट’च्या आयोजनाची जाहिरात दिली होती. जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर कट्टरतावादी नेते भडकले. वाद वाढताना पाहून सरकारने आयोजनावर बंदी घातली होती.
योगसराव करणाऱया महिलांनी सरकारचा निर्णय आपल्या अधिकारांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. आम्हाला आमच्या स्वातंत्र्यावरून रात्री निदर्शने करावी लागत आहे. सरकार बंदी हटवत नाही तोवर आमचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे महिला अधिकार कार्यकर्त्या नजीब हयात म्हणाल्या. महिलांनी निदर्शने चालविल्याने आता हा मुद्दा तापू लागला आहे. केवळ योगपुरती हा मुद्दा न राहता महिलांच्या सर्वप्रकारच्या स्वातंत्र्याची मागणी केली जातेय.
एखाद्या आखाती देशात हा अत्यंत आश्वासक ट्रेंड आहे. यात मुस्लीम महिलांनी कट्टरतावादाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी योगची मदत घेतली आहे. तर दुसरीकडे कुवैतमधील सर्वच राजकीय पक्ष हे कट्टरतावादी मानसिकतेचे आहेत. खुल्या जागेत योग करण्याचा प्रकार ‘सांस्कृतिक उपहास’ असल्याचे म्हणत विरोधी पक्षाचे खासदार हमदान अल आझमी यांनी बंदीचे समर्थन केले आहे.
महिलांच्या स्वातंत्र्यावरून आता सौदी अरेबिया देखील हळूहळू सजग होत असल्याचे उद्गार कुवैतमध्ये महिला अधिकारांसाठी मोहीम चालविणाऱया एलानॉद अलशरेख यांनी म्हटले आहे. मागील 3 वर्षांमध्ये महिलांच्या अनेक मागण्यांची पूर्तता झाली आहे. तरीही कुवैत अद्याप पूर्णपणे रुढिवादी आणि पुरुषप्रधान समाज म्हणून ओळखला जातो. योग हा अन्य देशातून आला असल्याने कुवैती समाजात कधीच मान्य राहिलेला नाही. याचमुळे खुल्या जागेत योग करण्यावर बंदी सुरूच राहणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.