हमसून हमसून रडला उमेदवार
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याचदरम्यान बलियामधील समाजवादी पक्षाचे उमेदवार आणि माजी मंत्री नारद राय यांचा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नारद राय बलिया येथली स्वतःच्या घरासमोर प्रचारादरम्यान हमसून हमसून रडले आणि अखेरीस बेशुद्ध पडले आहेत. नारद राय स्वतःच्या घराच्या छतावर फडकलेला भाजपचा झेंडा पाहून ते रडत होते.
भाजपचे नेते आमच्या घरात आग लावून देऊ इच्छितात. आमच्या घरात भाजपचा झेंडा लावणारे तसेच आमचे मन मोडणाऱयांबद्दल मी कधीच वाईट चिंतले नाही. मला मात्र वाईट अनुभव येत असल्याचे म्हणत नारद राय हमसून हमसून रडू लागले. त्यांच्या हातातून माइक देखील सुटला आणि ते बेशुद्ध होत खाली कोसळले.
नारद राय हे स्वतःचे मूळ गाव मुबारकपूरमध्ये प्रचार करत होते. त्याचदरम्यान चौक सभेत भाषण करत असताना अचानक ते भावुक झाले. त्यांचे मोठे बंधू वशिष्ठ राय हे भाजप उमेदवार दयाशंकर सिंह यांचे समर्थन करत आहेत. त्यांच्याकडूनच घरी भाजपचा झेंडा लावण्यात आला होता. भाजपचा झेंडा स्वतःच्या घरी लावण्यात आल्याचे पाहून नारद राय दुखावले गेले.









