प्रतिनिधी /मडगाव
गेली दोन वर्षे कोविड महामारीमुळे विद्यार्थी शाळेत पोचले नव्हते. मात्र, आत्ता कोविड नियंत्रणात येत आहे. त्यामुळे शिक्षण संचालकांनी शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला व काल सोमवारी असंख्य विद्यार्थी शाळेत पोचले. शाळेत जाण्याचा आनंद किती असतो याचा अनुभव काल विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी देखील घेतला.
दोन वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर काल शाळा सुरू झाल्या. शाळांचा परिसर एका वेगळय़ाच मूड मध्ये होता. अनेक शाळांनी विद्यार्थी वर्गात येणार असल्याने शाळांची सजावट केली होती. त्यामुळे उत्साही वातावरण होते. बच्चे कंपनी जेव्हा शाळेत पोचली तेव्हा शाळेच्या शिक्षकांनी त्यांची ओवाळणी करून त्यांचे स्वागत केले. हा क्षण विद्यार्थ्यांच्या मनात असंख्य वर्षे घर करून राहणार असाच होता.
विद्यार्थी व शिक्षक यांचे एक वेगळे नाते असते. गेली दोन वर्षे या नात्यापासून विद्यार्थी व शिक्षक दुरावले होते. कोविड महामारीमुळे शाळा बंद करणे भाग पडले होते. केवळ शिक्षक शाळेत येऊन ऑनलाईन वर्ग घेत होते. मात्र, विद्यार्थ्यांकडे प्रत्यक्ष संपर्क होत नव्हता. परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीनेच घेतल्या गेल्या. या परीक्षा केवळ नावापुरत्याच ठरल्या होत्या.
जो पर्यंत विद्यार्थी वर्गात येत नाही, तो पर्यंत शिक्षक देखील मनापासून विद्यादान करू शकत नाही. काल विद्यार्थी वर्गात पोचल्याने शिक्षक वर्गात उत्साही व आनंदी वातावरण निर्माण झाले होते. कोविड महामारी पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर वर्ग पूर्ण क्षमतेने सुरू केले जातील.
मडगावच्या पॉप्युलर हायस्कूलच्या मुख्याध्यापक आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना म्हणाल्या की, पाचवी व सहावीच्या वर्गात ज्या मुलांनी प्रवेश घेतला होता. त्यांचे तोंड देखील शिक्षकांनी बघितले नव्हते. काल जेव्हा हे विद्यार्थी वर्गात आले तेव्हा सर्व शिक्षकांनी मुद्दाम त्यांच्या वर्गात जाऊन भेट घेतली. या विद्यार्थ्यांच्या तोंडावर आनंद ओसडून वहात होता. आठवी व णववीचे विद्यार्थी प्रेक्टिल साठी शाळेत येत होते. त्यामुळे शिक्षक त्यांच्या संपर्कात होते. मात्र, पाचवी व सहावीचे विद्यार्थी पहिल्यादाच शाळेत आले होते. या विद्यार्थ्यांनी आम्ही आजपासून दररोज शाळेत येऊ असे आनंदाने शिक्षकांना सांगितले.
शाळेत येणाऱया मुलांनी एसओपी कशा प्रकारे पाळावे या संदर्भात विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले. शाळेत येताना न चुकता मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, शाळेत येताना स्वताच टिफीन आणावे पण ते इतरांसोबत खाऊ नये, वॉशरूम मध्ये गेल्यानंतर हात स्वच्छ धुणे तसेच सेनिटायझरचा वापर करणे इत्यादी संदर्भात मुलांना मार्गदर्शन करण्यात आले.









