प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर खंडपीठप्रश्नी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार व खंडपीठ कृती समितीचे पदाधिकारी यांची व्यापक बैठक येत्या 3 मार्च रोजी दुपारी चार वाजता मुंबईतील आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात होणार आहे. या बैठकीसाठी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. गिरीश खडके यांनी ही माहिती दिली.
कोल्हापूर खंडपीठ प्रश्नी सोमवारी खंडपीठ कृती समितीच्या पदाधिकाऱयांनी मंत्री सतेज पाटील यांची येथील सिंचन भवनमध्ये भेट घेऊन चर्चा केली. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्हय़ांसाठी खंडपीठ अत्यंत आवश्यक आहे. गेली पस्तीस चाळीस वर्षे खंडपीठाची मागणी प्रलंबित आहे. यापूर्वीचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांनी कोल्हापूर खंडपीठ स्थापनेबाबत अभिप्राय दिला आहे. या सर्व मुद्दय़ांची माहिती अध्यक्ष ऍड. गिरीष खडके यांनी मंत्री पाटील यांना दिली. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली.
मंत्री पाटील यांनी येत्या 3 मार्च रोजी मुंबईतील आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार व खंडपीठ कृती समितीचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली जाईल, असे खंडपीठ कृती समितीच्या पदाधिकाऱयांना सांगितले. मंत्री पाटील यांच्या पुढाकाराने होणाऱया या बैठकीत सकात्मक निर्णय होऊन पुढचे पाऊल पडेल, असे अध्यक्ष ऍड. गिरीश खडके यांनी सांगितले.
यावेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, सचिव ऍड. विजयकुमार ताटे-देशमुख, सहसचिव संदीप चौगुले, लोकल ऑडिटर संकेत सावर्डेकर, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. महादेवराव आडगुळे, ऍड. बाळासाहेब शेळके, ऍड. शिवाजीराव राणे, संपतराव पवार, ऍड. अजित मोहिते, ऍड. इंद्रजित चव्हाण, ऍड. रविंद्र जानकर, ऍड. नारायण भांदिगरे, ऍड. प्रकाश आंबेकर, ऍड. बंडगर, ऍड. सुशांत चेंडके, ऍड. प्रमोद दाभाडे, ऍड. अरूण शिंदे, ऍड. वारणा सोनवणे आदी उपस्थित होते.









