कोरोना लसीचा डोस घेऊनही प्रमाणपत्र नाही पण डोस न घेता काही जणांचे प्रमाणपत्र तयार
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना लसीकरण करण्यासाठी प्रत्येक गावोगावी मोहीम राबविण्यात आली. मात्र काही नागरिकांचे अद्याप प्रमाणपत्रच मिळालेले नाही. पण आता बूस्टर डोस घेण्यापूर्वीच काही नागरिकांना मॅसेज येत असून प्रमाणपत्रही मिळत आहे. त्यामुळे आरोग्य खात्याच्या सावळय़ा गोंधळाबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. डोस घेण्यापूर्वीच प्रमाणपत्र मिळत असल्याने नागरिकांना डोस घेण्याची गरज नाही का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
कोरोनाच्या प्रसारामुळे लसीकरण करणे बंधनकारक बनले आहे. तसेच प्रवास करण्यासाठी किंवा कोणत्याही ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. काही सामाजिक संघटनांच्या माध्यमातून लसीकरण मोहिमा आयोजित करण्यात आल्या होत्या. लसीकरणाचे डोस घेतल्यानंतर ऑनलाईन नोंद करून प्रमाणपत्र देण्यात येत होते. याकरिता आधारकार्ड क्रमांक सक्तीचा करण्यात आला होता. काही नागरिकांनी डोस घेऊन देखील प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचे प्रकार निदर्शनास आले होते.
मात्र आता बुस्टर डोस देण्याची मोहीम आरोग्य खात्याने सुरू केली आहे. या अंतर्गत ऑनलाईन नोंद करून नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे. मात्र डोस घेण्यापूर्वीच काही नागरिकांना आरोग्य खात्याकडून मेसेज आले आहेत. तसेच ऑनलाईन प्रमाणपत्र डाऊनलोड करून घेण्याची सूचना करण्यात येत आहे. डोस घेण्यापूर्वीच प्रमाणपत्र देखील मिळत आहे. त्यामुळे डोस घेण्याची गरज नाही का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. कोणत्याही ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्राची विचारणा केली जात आहे. पण डोस घेऊनही प्रमाणपत्र नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. डोस घेतल्यानंतर प्रमाणपत्र नाही आणि डोस घेण्यापूर्वीच प्रमाणपत्र तयार असा विचित्र सावळा गोंधळ आरोग्य खात्याचा सुरू आहे. मात्र यामुळे नागरिकांची गोची होत आहे.