ऑनलाईन टीम/ तरुण भारत
देशात पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. आज पंजाबमध्ये ११७ जागांसाठी तर उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. दरम्यान, पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात जोरदार लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः प्रचाराच्या रिंगणात उतरले होते. आता तर अरविंद केजरीवालांविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याने त्यांच्यावर पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
आपचे नेते अरिवद केजरीवाल यांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे निर्देश पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी शनिवारी मोहालीचे जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. केजरीवाल यांनी अन्य राजकीय पक्षांवर खोटे आरोप केल्याची तक्रार शिरोमणी अकाली दलाचे प्रवक्ते अर्शदीपसिंग क्लेर यांनी केली आहे. त्यासाठी आपच्या ध्वनिचित्रफितीचा दाखला दिला आहे. दरम्यान, केजरीवाल यांच्यावर आरोप करणारे आपचे माजी नेते कुमार विश्वास यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचा निर्णय केंद्रीय गृह खात्याने शनिवारी घेतला.