ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, त्याने भारतात दहशतवादी कारवायांसाठी एक टीम तयार केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाऊदविरोधात एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरच्या आधारे एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, मुंबई आणि दिल्लीत घातपात घडविण्यासाठी दाऊद सक्रिय झाला आहे. भारततातील राजकीय नेते आणि प्रसिद्ध उद्योजक त्याच्या रडारवर आहेत. यासाठी दाऊदने एक विशेष टीम तयार केली आहे. तसेच स्फोटकं आणि घातक शस्त्रास्त्रे यांच्या सहाय्याने देशातील विविध भागात हिंसाचार घडवण्याची योजनाही त्याने आखल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, दाऊदने डार्कनेट आणि क्रिप्टोकरन्सीचा वापर केल्याप्रकरणी ईडीकडून तपास सुरू आहे. दाऊद ऑफशोअर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिजिटल साधनांकडे वळाल्याचा ईडीला संशय आहे. तर दुसरीकडे ईडीने नुकतीच दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला मनी लाँडरिंगच्या चौकशीच्या संदर्भात शुक्रवारी अटक केली आहे.









